Shraddha Murder Case: पालघर येथील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब पूनावाला याने निर्घृण खून केला आहे. या खूनप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपीनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे केले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृत श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्रद्धाचे जसे ३५ तुकडे करण्यात आले, तशीच शिक्षा आफताबलाही द्यावी, त्याचेही ३५ तुकडे करावेत, आफताबसाठी यापेक्षा कठोर शिक्षा असूच शकत नाही, अशी संतप्त भावना श्रद्धाच्या मित्राने व्यक्त केली आहे. तो ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होता.
या हत्याकांडाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मृत श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला म्हणाला की, माझ्या मैत्रिणीसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच आम्हाला मोठा धक्का बसला. ती बेपत्ता असल्याची माहिती आम्हाला मे महिन्यातच मिळाली होती, पण ती कुठेतरी फिरायला गेली असावी, असं आम्हाला वाटलं. तरीही ती कुठे असेल, तिच्यासोबत काय झालं असेल? असे शेकडो प्रश्न मनात येत होते.
“हे प्रकरण समोर आल्यानंतर विश्वास बसत नाही की, आपण कोणत्या जगात जगतोय. मी आणि श्रद्धाने २०१५ ते २०१८ या काळात पदवीचं शिक्षण घेतलं. २०१९ मध्येही आम्ही एकत्र परीक्षा दिली होती. तोपर्यंत ती माझ्या संपर्कात होती. त्याआधी आम्ही थिएटरच्या शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र होतो. त्यामुळे आमचं नेहमी बोलणं व्हायचं.ती खूप हुशार मुलगी होती, तिला उज्ज्वल भविष्य होतं. तिला बोलायला खूप आवडायचं. ती हसती खेळती मुलगी होती, ती ‘जॉली’ स्वभावाची होती” असंही श्रद्धाचा मित्र म्हणाला.
“या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही खूप दु:खी आहोत. दु:ख व्यक्त करायला माझ्याकडे शब्दही पुरेशे नाहीत. माझी हात जोडून विनंती आहे, की हे प्रकरण लवकरात लवकर जलद गती न्यायालयात आणलं पाहिजे. तसेच याचा तपास सीबीआयकडून करावा. आफताब कोण आहे? त्याला कुणाचा पाठिंबा आहे? तो कुणाशी जोडला गेला आहे? हे सर्व समोर येणं गरजेचं आहे. कारण त्याने आपल्या प्रेयसीचे ३५ तुकडे केले आहेत, ही बाब अशक्य वाटते. तो एखाद्या दहशतवादी किंवा धार्मिक मोहिमेशी जोडलेला असावा, अशी भीती माझ्या मनात आहे. त्यामुळे याचा तपास होणं आवश्यक आहे. श्रद्धासोबत जे घडलं तेच आफतासोबत व्हायला पाहिजे, त्याचेही ३५ तुकडे करायला हवे, आफताफला यापेक्षा दुसरी कठोर शिक्षा असूच शकत नाही” अशी प्रतिक्रिया रजतने दिली आहे.