एका नविवाहितेने २९ जून रोजी हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिचं आय़ुष्य संपवलं आहे. नवरा आणि सासरच्या मंडळींकडून या मुलीला मानसिक आणि शारिरीक छळ सहन करावा लागत होता. तीन महिन्यांपासून होणारा हा छळ सहन न झाल्याने या नवविवाहितेने किटकनाशक गोळ्या घेऊन आयुष्य संपवलं. तामिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकी ही घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिधान्या आणि केविन कुमार या दोघांचं लग्न २८ एप्रिल रोजी झालं होतं. त्यावेळी रिधान्याच्या कुटुंबाने ७० लाखांची व्होल्वो कार आणि ८०० ग्रॅम सोनं हुंडा म्हणून दिलं होतं. तरीही आणखी हुंडा हवा म्हणून रिधान्याचा छळ सुरु होता. शेवटी तिने कारमध्ये विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केली. एका देवळाजवळ तिची कार उभी होती. त्यात बसलेली रिधान्या काहीच प्रतिसाद देत नव्हती म्हणून पोलिसांना कळवण्यात आलं. ज्यानंतर तिचा मृतदेह पोलिसांना मिळाला. तिच्या तोंडातून फेस येत होता. ज्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर रिधान्याने विषारी गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. Free Press Journal ने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांना या प्रकरणात रिधान्याच्या काही व्हॉईस नोट्स सापडल्या आहेत. तिने या व्हॉईस नोट्समध्ये तिचा कसा छळ होतो आहे ते सांगितलं आहे.
रिधान्याच्या ऑडिओ नोट्समध्ये तिने काय म्हटलं आहे?
“हुंडा आण, पैसे आण म्हणून माझा नवरा आणि सासरचे लोक रोज छळ करत आहेत. या सगळ्यांकडून मला रोज शिवीगाळ केली जाते, मारहाण केली जाते.”
“माझा रोज मानसिक आणि शारिरीक छळ होतो आहे. त्याला मी कंटाळले आहे. मला होणारा त्रास हा आता असह्य पातळीवर गेला आहे. सगळं काही सहन करुन मी थकले आहे.”
“मी काहीही चूक केलेली नाही. तरीही मला मारहाण केली जाते आहे. माझा नवरा माझा शारिरीक छळ करतो आणि सासरचे लोक मानसिक छळ करतात. मला माझं हे आयुष्य आवडत नाही. मी माझं आयुष्य जगण्यास लायक आहे असं वाटत नाही. बाबा मला माफ करा मी आयुष्य संपवते आहे.” असं म्हणत रिधान्याने तिचं आयुष्य संपवलं.
रिधान्याच्या मृत्यूनंतर तिघांना अटक
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रिधान्याचा नवरा केविन कुमार, तिचे सासरे आणि सासू या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे. दरम्यान रिधान्याचे सगळे नातेवाईक रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. त्यांनी रिधान्याला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.