Jabalpur News : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका टेक इन्स्टिट्यूटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या इन्स्टिट्यूटमधील एका विद्यार्थिनीने तिच्या रूममेटचे अंघोळ करतानाचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि ते व्हिडीओ दिल्लीतील तिच्या प्रियकराला पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका विद्यार्थिनीला अटक केली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपी विद्यार्थिनी ही दोन वर्षांपासून गुप्तपणे असे व्हिडीओ बनवत होती. मात्र, तिला असे व्हिडीओ बनवताना एका विद्यार्थिनीने पाहिलं आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, रविवारी एक विद्यार्थिनी अंघोळ करत असताना एक विद्यार्थिनी दुसऱ्या बाथरूमच्या पाईपवर उभी असल्याचं दिसून आलं, तसेच ती व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असल्याचं दिसून आलं.
यानंतर त्या विद्यार्थिनीने तातडीने वसतिगृहाचा अलार्म वाजवला. त्यानंतर लगेच या घटनेची माहिती तिने कॉलेज आणि हॉस्टेल व्यवस्थापनाला दिली. यानंतर सोमवारी सकाळी संबंधित विद्यार्थिनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने दुमना पोलीस चौकीत पोहोचले. मात्र, यावेळी तेथील पोलिसांनी गुन्हा दाखल न करता त्या खमारिया पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
खमारिया पोलीस ठाण्याच्या प्रभारी सरोजिनी टोप्पो यांनी सांगितलं की, “आरोपी विद्यार्थीनी महाराष्ट्रातील गोंदिया येथील आहे. तिची चौकशी केली असता तिने सांगितलं की, तिची सोशल मीडियावर दिल्लीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी मैत्री झाली होती. त्यांची मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणि खळबळजनक करण्याचं ठरवलं. तेव्हा तिने तिच्या वसतिगृहातील मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले”, असं आरोपी विद्यार्थीनीने सांगितलं.
दरम्यान, शहराचे एसपी रांझी सतीश कुमार साहू यांनी सांगितलं की, “या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी विद्यार्थीनीला अटक करण्यात आलं आहे. तसेच तिने तिच्या मैत्रिणींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या आरोपाची पोलीस तिची चौकशी करत आहेत.”