मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! केंद्राची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली आहे.

supreme-court-2
सर्वोच्च न्यायालय (संग्रहीत छायाचित्र)

मराठा आरक्षणासंदर्भात ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवत पहिला धक्का दिल्यानंतर आज केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दुसरा झटका दिला आहे. १०२व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास अर्थात SEBC मध्ये नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचा किंवा नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याच्या आपल्या आधीच्या भूमिकेवरच सर्वोच्च न्यायालय ठाम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वरा राव, न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा रद्दबातल ठरवत मराठा आरक्षणच रद्द केलं. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या तीव्र नाराजीचा सामना राज्य सरकारला सहन करावा लागला. राज्यघटनेच्या १०२व्या घटनादुरुस्तीनुसार एसईबीसीचे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा राज्य सरकारने केलेला कायदा रद्द ठरवला. आरक्षणाचं प्रमाण ५० टक्क्यांच्या वर जाण्याचा मुद्दा देखील या सुनावणीमध्ये महत्त्वाचा ठरला होता.

१०२ व्या घटनादुरुस्तीचा मुद्दा चर्चेत

२०१८मध्ये करण्यात आलेल्या १०२व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये ३३८ ब हे कलम समाविष्ट करण्यात आलं. या कलमामध्ये राष्ट्रीय मागास आयोगाची रचना, कर्तव्य आणि अधिकार विषद करण्यात आले आहेत. तर कलम ३४२ अ मध्ये एखाद्या जातीला सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवण्याचा राष्ट्रवतींचा अधिकार आणि अशा जातींची यादी बदलण्याचा संसदेचा अधिकार याविषयी नमूद करण्यात आलं आहे.

“आम्ही केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका पाहिली. ५ मे रोजी देण्यात आलेल्या निकालाच्या विरोधात ही याचिका करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेले मुद्दे पुनर्विचार याचिका स्वीकारण्यासाठी पुरेसे नाहीत. यातल्या बहुतेक मुद्द्यांचा ५ जून रोजी दिलेल्या निकालामध्ये परामर्श घेण्यात आला आहे”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

मराठा आरक्षण रद्द करण्याविरोधात राज्य सरकारची फेरविचार याचिका

खासदार संभाजीराजे आरक्षणासाठी आक्रमक

दरम्यान, याच प्रकरणात राज्य सरकारकडून देखील सर्वोच्च न्यायालया पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवलं होतं. त्यांच्या आंदोलनाच्या हाकेलाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. संभाजीराजे भोसले यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी, विरोधी पक्ष नेत्यांशी आणि इतर पक्षीय नेत्यांशी देखील यासंदर्भात चर्चा केली असून राज्य सरकारला मराठा समाजाच्या वतीने काही मागण्या देखील सादर केल्या. या मागण्या कालबद्ध नियोजनानुसार पूर्ण करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांकडून त्यांना देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची याचिका फेटाळण्यात आल्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरू अलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Supreme court rejects review petition filed by central government on maratha reservation pmw