Supreme Court on Age of the witness : सर्वोच्च न्यायालयाने खूनाच्या एका खटल्याप्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या प्रकरणात एका इसमाने त्याच्या पत्नीची हत्या केली होती. तो त्याच्या पत्नीचा खून करत असताना त्याच्या सात वर्षांच्या मुलीने सगळं दृष्य पाहिलं होतं. याप्रकरणी न्यायालयाने मुलीच्या साक्षीच्या आधारावर निकाल दिला आहे. हा निकाल देताना आरोपीच्या वकिलांनी मुलीच्या वयाचा उल्लेख करत तिच्या साक्षीवर आक्षेप घेतला. मात्र, न्यायालयाने म्हटलं की अशा प्रकरणांमध्ये साक्षीदारासाठी वयाची मर्यादा नाही. एखादं मूल साक्ष देण्यास सक्षम असेल तर त्या मुलाची साक्ष इतर साक्षीदारांप्रमाणेच वैध असेल. सर्वोच्च न्यायालयाने या सात वर्षाच्या मुलीने दिलेली साक्ष वैध मानत आरोपी पित्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुलीने तिच्या वडिलांना तिच्या आईचा खून करताना पाहिलं होतं.

या खटल्याप्रकरणी यापूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने मध्य प्रदेश न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे.

पत्नीची गळा दाबून हत्या

हे २००३ चं प्रकरण आहे. मध्य प्रदेशमधील सिंगराई गावातील बलवीर सिंह नावाच्या एका इसमाने त्याची पत्नी बीरेंद्र कुमारी हिची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर बलवीरने त्याच्या बहिणीच्या मदतीने पत्नीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले. मृत महिलेचे नातेवाईक भुरा सिंह यांना या अंत्यसंस्कारांची माहिती मिळाली आणि त्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं. मृत बीरेंद्र कुमारी यांची मुलगी राणी ही या हत्येची साक्षीदार होती. तिने न्यायालयाला सांगितलं की तिच्या वडिलांनीच आई बीरेंद्र कुमारी यांची गळा दाबून हत्या केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान मुलीच्या साक्षीबाबत न्यायालयाची न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

दरम्यान, लहान मुलीच्या साक्षीवर आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतल्यावर न्यायमूर्ती म्हणाले, लहान मुलांच्या साक्षीवर विसंबून राहताना त्यांच्या वक्तव्याची खातरजमा करण्याबाबतचा कोणताही नियम नाही. त्यावर विश्वास ठेवणं ही सावधगिरीची व विवेकाची बाब आहे. या खटल्यातील विशिष्ट तथ्ये व परिस्थिती पाहता मुलीने दिलेल्या साक्षीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा लागेल.याचबरोबर न्यायालयाने आणखी एक बाब नमूद केली की साक्षीदार म्हणून लहान मुलं धोकादायक मानली जातात. कारण लहान मुल सहजपणे कोणाच्याही प्रभावाखाली येऊ शकतात. त्यांना काय साक्ष द्यायची याबाबत शिकवलं जाऊ शकतं. मात्र, हे प्रकरण वेगळं आहे. कुठल्याही प्रकरणात साक्ष देणारं मूल कोणाच्याही प्रभावाखाली नाही, अथवा त्या मुलाला कोणीही शिकवलेलं नाही ही गोष्ट न्यायालयाने तपासायला हवी.