युद्धग्रस्त येमेनमधून परत आलेल्या भारतीय व इतर देशांच्या नागरिकांना मुंबई विमानतळावर महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेल्या विशेष सहकार्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्य सरकारचे कौतुक केले. येमेनमधून भारतीय नागरिक परत आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेले प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाल्याचे आणि जगातील विविध देशांनी या मोहिमेबद्दल भारताचे विशेष कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. सुषमा स्वराज यांनी लोकसभेमध्ये निवेदन करून येमेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या मोहिमेबद्दल माहिती दिली.
या निवेदनावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. या मोहिमे अंतर्गत मुंबई विमानतळावर उतरलेल्या नागरिकांना महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून दिली. तेथून येणाऱय़ा नागरिकांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदतही उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले आणि राज्य सरकारचे कौतुक केले. एकूण २७ राज्यांतील हजारो नागरिकांना केंद्र सरकारने येमेनमधून सुखरूपपणे भारतात आणल्याचे सांगितले. त्याचबरोबर येमेनमध्ये अडकलेले इतर देशांतीलही हजारो नागरिक या मोहिमेच्या माध्यमातून भारतात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.