युवराजांचा ‘कॉर्पोरेट स्पर्श’
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठिकठिकाणी घेण्यात येणाऱ्या स्वतंत्र कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेना युवराजांचे आरोहण करण्याची धडपड करीत आहे. पक्ष तिसऱ्या पिढीच्या हाती येईपर्यंत अनेक बदल घडत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाची धार उभ्या महाराष्ट्राला परिचित. उद्धव यांच्या हाती पक्षाची सूत्रे आल्यानंतर ही शैली बदलली. अनेकांना ती मवाळ वाटली. युवा सेनेचे प्रमुख आदित्य हेदेखील तीच शैली आधुनिक साधनांनी पुढे नेत आहेत. कॉर्पोरेट स्पर्श असणारा ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमातून तो बाज अधोरेखित झाला. भगवा टिळा, झुपकेदार दाढी आणि भगवी वस्त्र ही शिवसैनिकांची कधीकाळी असलेली ओळख. तेदेखील आमूलाग्र बदलले आहेत. नव्या पिढीच्या शिवसैनिकांमध्ये तसे कोणी शोधूनही सापडत नाही. उलट युवराजांची वेशभूषा तरुणाईला आकर्षित करणारी. त्याचे अनुकरण नवे शिवसैनिक करत आहेत. इतकेच नव्हे तर, सेनेची विचारक्षमताही विस्तारली. नाशिकमधील कार्यक्रमात याच व्यासपीठावर तासभर ‘इंडियन रॉक, सुफी म्युझिक’चा दणदणाट झाला. नंतर पारंपरिक ढोलवादनाचा क्रमांक लागला. युवराजांनी तरुणाईशी संवाद साधायला सुरुवात केली अन् पहिलाच प्रश्न नीलेश राणे नामक युवकाचा आल्यावर तेही क्षणभर चकित झाले. सिंहासनाकडे जाणारा मार्गही काटेरी असतो हे खरे!
आ क डे मो ड
२०१४ लोकसभा निवडणुकीत राज्यात राजकीय पक्षांना मिळालेली एकूण मते
भाजप १ कोटी ३३ लाख ८ हजार ९६१
शिवसेना १ कोटी ५० हजार ६५२
कॉंग्रेंस ८८ लाख ३० हजार १९०
राष्ट्रवादी कॉंग्रेंस ७७ लाख ८२ हजार २७५
२०१४ विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना मिळालेली मते
भाजप १ कोटी ४७ लाख ९ हजार २७६
शिवसेना १ कोटी दोन लाख ३५ हजार ९७०
कॉंग्रेंस ९४ लाख ९६ हजार ०९५
राष्ट्रवादी कॉंग्रेंस ९१ लाख २२ हजार २८५