इंडिया आघाडीच्यावतीने ३१ मार्च रोजी दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून देशभरातून जवळपास २८ पक्षांनी एकत्र येत भाजपावर हल्लाबोल केला. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या सभेत बोलताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी असल्याचा टोला लगावला आहे.

तेजस्वी यादव नेमके काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदींची गॅरंटी’ अशा स्वरूपाचा नारा दिला आहे. यानंतर ‘मोदींची गॅरंटी’ अशी एक मोहीम भाजपाकडून चालू करण्यात आली. या मोहिमेवर आता तेजस्वी यादव यांनी टीका केली. यादव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी आहे. जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत मोदींची गॅरंटी आहे. मात्र, निवडणुका संपल्यानंतर काही नाही. त्यामुळे मोदींची गॅरंटी ही फक्त निवडणुकीपर्यंत टिकेल”, असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवडणुकीबाबत विधान चर्चेत; म्हणाले, “मी आयुष्यात कधी निवडणूक लढवण्याचा विचारच केला नव्हता, अचानक…!”

भाजपाला सत्तेतून बाहेर खेचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. यावरूनच तेजस्वी यादव यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “भाजपावाल्यांनी निवडणुकीच्या आधीच ४०० पारचा नारा दिल्यामुळे आधीच मॅच फिक्सिंग झाल्यासारखे वाटते आहे. मात्र, भाजपाचे नेते काही म्हणाले तरी जनता हीच देशाची मालक असते. त्यामुळे जनता जे ठरवेल तेच दिल्लीत सरकारमध्ये बसतील. काही झाले तरी या भाजपाला सत्तेतून बाहेर खेचा”, असे तेजस्वी यादव म्हणाले.

ईडी, सीबीआय भाजपाचे सेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या निवडणुकीवेळी काही आश्वासने दिले होते. त्यावर बोलताना तेजस्वी यादव यांनी तरुणांना भाजपाच्या खोट्या आश्वासनांना आणि खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले. “देशात बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे दुश्मन आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही कोणतीही नोकरी दिली नाही. सर्वच्या सर्व खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे भाजपाचे सेल झाले आहेत”, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.