भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीच्या निकालांचा माहिती भारतीय ड्रग कंट्रोलर जनरलला सादर केला आहे. निकालासंदर्भात औषध नियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीशी २२ जून रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. तर, बुधवारी हैदराबादस्थित भारत बायोटेक त्याच्या लसीसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेबरोबर ‘प्री-सबमिशन’ बैठक देखील होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचबरोबर, जागतिक आरोग्य संघटना आपात्कालीन वापरासंदर्भात भारत बायोटेकला त्याची लस निर्यात करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना परदेशामध्ये प्रवास करतना कोणतीही अडचण येणार नाही. कारण अद्याप इतर देशांमध्ये ही लस घेतलेल्या लोकांना परवानगी नाकारली आहे किंवा पुन्हा लस घेण्यास सांगितले आहे.

भारत बायोटेक जुलै महिन्यात चाचणी निकाल सादर करेल आणि संपूर्ण परवान्यासाठी अर्ज करेल असे या महिन्याच्या सुरूवातीला सांगितले होते. तसेच, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल हा सर्वात आधी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला सादर केला जाईल असे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

मार्चमध्ये सादर केले गेले होते पहिले विश्लेषण

मार्चमध्ये भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील निकालांचे पहिले विश्लेषण प्रसिद्ध केले होते. ज्यामध्ये दुसर्‍या डोसनंतर ८१ टक्क्यांपर्यंत करोनाला रोखता येऊ शकते असे सांगण्यात आले होते. त्याच वेळी, माहितीमध्ये संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याच्या शक्यतांमध्ये देखील १०० टक्के घट झाली होती. कोव्हॅक्सिनची निर्मिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेकतर्फे करण्यात आली आहे. यासह, भारत बायोटेकने पॅनेशिया बायोटेक, हेस्टर बायो आणि ज्युबिलंट फॉरनॉव यांच्याशी करार केला आहे.

दरम्यान, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनमधील चाचणी विश्लेषण अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त पिअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशीत झालेला नाही. भारत बायोटेकने या महिन्याच्या सुरुवातीला असे सांगितले होते की, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला सादर केल्यानंतर तीन महिन्यांच्या मुदतीत ही माहिती प्रसिद्ध केली जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third phase bharat biotech covaxin is 77 per cent effective submitted information to the government abn
First published on: 22-06-2021 at 17:12 IST