नागपूर : भारतात मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख वाढतच चालला आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत भारतात वाघाच्या हल्ल्यात ३७८ मानवी मृत्यूची नोंद झाली आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक २१८ मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, मानव-वन्यजीव संघर्षावरील पर्याय म्हणून केंद्र सरकार ‘टायगर आउटसाईड टायगर रिझर्व्ह’ या प्रकल्पाची आखणी करत आहे.

देशातील एकूण वाघांपैकी सुमारे ३० ते ४० टक्के वाघ अधिसूचित अभयारण्याबाहेर मुक्तपणे फिरत आहेत. त्यामुळेच अलीकडेच केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ‘टायगर आउटसाईड टायगर रिझर्व्ह’ या प्रकल्पाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने हा प्रकल्प तयार केला आहे. २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षांसाठी हा प्रकल्प ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून राबवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मानव-वाघ आणि सहभक्षक संघर्षाची नोंद आहे, त्याठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.

संरक्षित अभयारण्याबाहेर फिरणारे वाघ मानवी वस्तीजवळ येतात किंवा पशुधन मारतात तेव्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था तर बिघडतेच, पण संवर्धनासाठी पाठिंबा कमी होतो. अशावेळी सूडबुद्धीने वाघाची शिकार केली जाते. वाघांच्या वाढत्या वाढीचा दर (६.१ टक्के) पाहता संवर्धन पद्धती, वाढती मानवी लोकसंख्या आणि विस्तारित पायाभूत सुविधांसह येत्या काही वर्षांत मानव-वाघ संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे.

राज्यनिहाय मानवी मृत्यूची संख्या

भारतात २०२२ या एका वर्षात वाघाच्या हल्ल्यात ११० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. तर महाराष्ट्रात ८२ मृत्यूची नोंद या वर्षात होती. मागील पाच वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. तर २०२० मध्ये ५१, २०२१ मध्ये ५९, २०२३ मध्ये ८५ आणि २०२४ मध्ये ७३ जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यात उत्तर प्रदेशमध्ये गेल्या पाच वर्षात ६१ मानवी मृत्यू, तर मध्य प्रदेशात ३२ मानवी मृत्यूची नोंद झाली. आसाम, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, तेलंगण, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये वाघाच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. तर ओडिशा, राजस्थान, झारखंड आणि मिझोरम यासारख्या राज्यांमध्ये एकही मृत्यू नाही.