वाहतूक कोंडी म्हटल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसोंदिवस वाढतानाच दिसत आहे. मात्र जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच एका कंपनीने जाहीर केली. या यादीमधील पहिले नाव ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. या यादीनुसार जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे.

अॅपल आणि उबर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणाऱ्या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील ५६ मोठ्या देशांचा अभ्यास करुन एक अहवाल सादर केला आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमधील मोठ्या शहरांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा किती टक्के अधिक वेळ लागतो हे या अहवालात सांगण्यात आले आहे. या अहवालानुसार मुंबईमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा ६५ टक्के अधिक वेळ लागतो असे म्हटले आहे. मुंबई खालोखाल या यादीमध्ये भारतातील दुसरे शहर आहे ते म्हणजे राजधानी दिल्ली. सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या जागतिक यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा ५८ टक्के अधिक वेळ लागतो.

जाणून घेऊयात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारी जगातील टॉप पाच शहरे कोणती आहेत

१)
भारताची  आर्थिक राजधानी मुंबई 
चा या यादीमध्ये पहिला क्रमांक लागतो.

२)
मुंबई शहराचा या यादीमध्ये पहिला क्रमांक असून दुसऱ्या क्रमांकावर कोलंबियाची राजधानी असलेले बोगोटा  हे शहर आहे. बोगोटामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला अपेक्षेपेहून ६३ टक्के अधिक वेळ लागतो. बोगोटामधील वाहतूक कोंडीला कंटाळून तेथील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी आंदोलनही केले होते.

३)
दक्षिण अमेरेकेमधील पेरू देशाची राजधानी असणारे लिमा  शहर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरामध्ये वाहतूक कोंडीमुळे नियोजित स्थळी पोहचण्यासाठी अपेक्षित वेळेहून ५८ टक्के अधिक काळ लागतो.

४)
चौथ्या स्थानावर भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहराचा क्रमांक या यादीत लागतो. दिल्लीमध्ये एका जागेहून दुसऱ्या जागी जाताना अपेक्षेहून ५८ टक्के अधिक काळ लागतो.

५)
रशियाची राजधानी
असलेले मॉस्को  हे शहर ‘टॉमटॉम’ने तयार केलेल्या या यादीत पाचव्या स्थानावर आहे. वाहतूक कोंडीमुळे मॉस्कोमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ५६ टक्के जास्त वेळ लागतो.

विशेष म्हणजे चीनसारख्या देशातील एकाही शहराचे नाव टॉप पाच मध्ये नाही. चीनमध्ये वाहनांची संख्या जास्त असली तरी तेथील रस्ते मोठे असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत नाही.