पीटीआय, रांची, नवी दिल्ली : झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोरेन यांनी तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री पद सांभाळले. २००५ मध्ये तर ते केवळ १० दिवसांसाठीच मुख्यमंत्री होते. आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. झारखंडमध्ये ते ‘गुरूजी’ या नावाने सर्वसामान्यांमध्ये ओळखले जात. वेगळ्या झारखंड राज्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले. त्यांच्या मागणीला २००० मध्ये यश आले. राज्याला वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
शिबू सोरेन यांचा मुलगा आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी, ‘‘आदरणीय दिशोम गुरुजी आम्हाला सोडून गेले… मी आज शून्य झालो आहे,’’ असे ‘एक्स’वर लिहिले. झारखंड विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शिबू सोरेन यांच्या निधनाचे वृत्त आल्यांतर त्यांच्या सन्मानार्थ विधानसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. तसेच राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. या काळात सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून सोमवारी आणि मंगळवारी सर्व सरकारी कार्यालये बंद राहतील असे सरकारकडून सांगण्यात आले.
शिबू सोरेन यांचे पार्थिव संध्याकाळी रांचीला आणण्यात आले. त्यांच्या रामगढ जिल्ह्यातील मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती ‘झामुमो’कडून देण्यात आली. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. ए. के. भल्ला यांनी सांगितले की, ‘‘दीड महिन्यांपूर्वी शिबू सोरेन यांना पक्षाघात झाला होता. गेले महिनाभर त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी ८.५६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळ होते.’’
शिबू सोरेन यांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.