आज आम्ही निवडणूक प्रचाराला आलेलो नाही. आमच्या दोन बहिणी हिंमतीने लढत आहेत. कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल यांना साथ द्यायला आम्ही आलो आहोत. मी त्यांना सांगू इच्छितो सगळा देश तुमच्या बरोबर आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रामलीला मैदानावर भाषणाला सुरुवात केली. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना अटक करुन कुणी घाबरेल असं जर भाजपाला वाटत असेल तर मी सांगू इच्छितो देशातला प्रत्येक जण घाबरणारा नाही तर लढणारा आहे. हिंमत असेल तर सगळ्या एजन्सीजना घ्या आणि सांगून टाका, भाजपा सह ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय आहे. मी आव्हान देतो आहे.

४०० पारचा नारा भाजपाने दिला आहे. एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक ठरणार आहे. आता ती वेळ आली आहे एका पक्षाचं सरकार चालणार नाही. मी देशाला आवाहन करतो की इंडिया आघाडीला निवडा. समन्वय असलेलं आणि लोकांचा सन्मान करणारं सरकार आपल्याला आणायचं आहे. तसं करायचं नसेल तर तुमचं भवितव्य कुणाच्या हाती द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आम्ही निवडणूक प्रचारासाठी नाही लोकशाही वाचली पाहिजे म्हणून आलो आहोत. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकलं. याचं कारण काय? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने लावले होते त्यांना भाजपाने त्यांच्या वॉशिंगमध्ये धुतलं आणि आपल्या बरोबर मंचावर बसवलं. असे भ्रष्ट लोक देशाचा विकास करु शकतात का? आपल्या रॅलीला भाजपाने ठगोंका मेला म्हटलं आहे. इथे जमलेले लोक ठग आहेत का? भाजपाचे लोक भ्रष्टाचारी आहेत.

अब की बार ४०० पारचा नारा त्यांनी दिला आहे. मात्र या सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही. अब की बार भाजपा तडीपार हा नारा आपण दिला पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.