अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचं दिसून येत आहे. निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रीय स्तरावर एकीकडे भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज झाली असताना दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतही मोदींसमोर कोण? या प्रश्नावरचा खल अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण दिवसेंदिवस वाढू लागल्याचं दिसत असतानाच उद्भवलेल्या एका मुद्द्यामुळे केंद्र सरकार अडचणीत आल्याचं दिसू लागलं. या मुद्द्यावर आता ठाकरे गटाकडून भाष्य करण्यात आलं असून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलंय?

गेल्या वर्षभरापासून देशभरात विविध प्रकारची आंदोलनं झाल्याचं दिसून आलं. त्यातही दिल्लीत झालेलं कुस्तीपटूंचं आंदोलन प्रचंड चर्चेत आलं. काही महिने लढा दिल्यानंतर केंद्र सरकारने कुस्तीपटूंना काहीसा दिलासा देत ब्रिजभूषण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हायला लावलं. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या महासंघाच्या निवडणुकांमध्ये ब्रिजभूषण सिंह यांचेच निकटवर्तीय अध्यक्षपदी बसल्यामुळे त्यावर कुस्तीपटूंकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. साक्षी मलिकनं थेट कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बजरंग पुनियानं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर त्यांना लिहिलेल्या एका पत्रावर त्याचा पद्म पुरस्कार ठेवला. परिणामी कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला घ्यावा लागला.

“निवडणुकांना काही अवधी असता तर…”

“संजय सिंह हे बृजभूषण यांचे खासमखास तर होतेच, शिवाय तेवढेच वादग्रस्त होते. कुस्ती महासंघातील हा बदल न्यायासाठी झगडणाऱ्या कुस्तीपटूंसाठी ‘पंत गेले, राव लढले’ असाच होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद महागात पडणार याची जाणीव झाल्यानेच मोदी सरकारला जाग आली आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघ नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, हे उघड आहे. लोकसभा निवडणुकीला काही अवधी असता तर कदाचित मोदी सरकारचे कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत ‘वेड पांघरून पेडगावला जाणे’ सुरूच राहिले असते”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

“सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे पागल…”, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची बोचरी टीका

“राष्ट्रीय कुस्ती महासंघ नवीन पदाधिकाऱ्यांसह बरखास्त झाल्याने कुस्तीपटूंना संपूर्ण न्याय नाही, तरी दिलासा मिळाला आहे. वर्षभर झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली आहे. तेव्हा मोदी सरकारचे आता किंचित थरथरलेले कानाचे पडदे पुन्हा बधिर होऊ नयेत यासाठी कुस्तीपटूंना यापुढेही हाकारे-नगारे वाजवावेच लागतील”, असंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction shivsena slams pm narendra modi on wrestlers protest brijbhushan singh pmw
First published on: 26-12-2023 at 08:25 IST