मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर निर्घुण बलात्कार झाला होता. बलात्कार झाल्यानंतर आरोपीने तिला अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यातच फेकलं. याप्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संताप व्यक्त करण्यात आला होता. आता, आरोपीच्या घरावर बुल्डोझर चालवण्यात येणार आहे. उज्जैन महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

भारत सोनी या रिक्षाचालकाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या क्रूर घटनेनंतर त्याने तिला रस्त्यावर फेकून दिलं. अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत ती सगळ्यांकडे मदतीची मागणी करत होती. परंतु, तिच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. अखेर, एका तरुण पुजाऱ्याने तिची मदत करून तिच्यावर उपचार केल. तसंच, त्यानेच हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर, या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची तपासणी करायला सुरुवात केली. पोलिसांनी जवळपास ७०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, पोलिसांनी पुन्हा त्याला शिताफीने अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उज्जैनमधील सरकारी जागेवर आरोपी भरत सोनी त्याच्या कुटुंबियांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून तिथे राहतो. त्यामुळे त्याच्या घरावर उद्या कारवाई करण्यात येणार आहे. ही जागा सरकारी असल्याने कारवाईसाठी कोणतीही नोटीस बजावण्यात येणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त रोशन सिंग यांनी दिली. मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली जाणार आहे.