Ukraine drone attack on Russia : गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु आहे. रशिया आणि युक्रेन संघर्षाचा फटका जगभरातील अनेक देशांना सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. तसेच रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश आलं नाही. असं असतानाच युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. यामध्ये रशियाची अनेक विमानं उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता या दोन्ही देशातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
युक्रेनने केलेल्या हल्ल्याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यानंतर ओलेन्या एअरबेसवर रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्समध्ये आग लागली. वृत्तानुसार मागील दोन वर्षांपासून जो संघर्ष सुरु आहे त्यात युक्रेनने रशियाच्या विरोधात हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. युक्रेनने या हल्ल्यात १०० हून अधिक ड्रोनचा वापर करत रशियाच्या हवाई तळांवर ४१ रशियन विमाने नष्ट केली.
युक्रेनियन सैन्यांनी रशियन फेडरेशनच्या भागात एकाच वेळी हल्ले केले. हवाई तळांवर हल्ला केला आणि जमिनीवर असलेल्या ४१ रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना नुकसान पोहोचवलं. अंदाजानुसार रशियन फेडरेशनच्या बॉम्बर फ्लीटपैकी ३० टक्क्यांहून अधिक Tu-95 आणि Tu-22s आणि A-50 एअरबोर्न रडार युक्रेनियन ड्रोनने नष्ट केले. दरम्यान, या हल्ल्याला रशियन माध्यमांनी ‘पर्ल हार्बर’ असं म्हटलं आहे. दरम्यान, युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्यातील चार महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला
युक्रेनने आतापर्यंतचा सर्वात मोठा हा ड्रोन हल्ला केला आहे. ज्यामध्ये ओलेन्या (मुर्मन्स्क) आणि इर्कुत्स्क (सायबेरिया) येथील दोन हवाई तळांवर ६००० किमी पेक्षा जास्त अंतरावर आणि तीन टाइम झोनमध्ये हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही युक्रेनियन सैन्याला काही हानी झाली नाही.
पाश्चात्य देशांनी शस्त्रास्त्रे पुरवले का?
रशिया-युक्रेन युद्ध हे मॉस्को आणि नाटो यांच्यातील एक छुप युद्ध असल्याचं बोललंत जातं. कारण ज्यामध्ये युक्रेनियन सैन्य पाश्चात्य देशांनी पुरवलेल्या शस्त्रास्त्रे आणि दळणवळण प्रणालींचा वापर करून लढत आहे. या तरतुदी रशियासाठी दीर्घकाळापासून वादाचा मुद्दा आहेत. ज्याने संपूर्ण युरोपमधील नाटो तळ आणि दारूगोळा डेपोवर हल्ला करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. दरम्यान, याबाबत युक्रेनने असं म्हटलं आहे की हे हल्ले नाटो किंवा पाश्चात्य देशांच्या सहभागाशिवाय स्वतःहून केले गेले आहेत.
रशिया अण्वस्त्रांचा वापर करेल का?
या संघर्षात रशियाने अण्वस्त्रे वापरण्याची देखील धमकी दिली. आता युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ला हा मोठा आहे. याचा अर्थ असा की पूर्ण युद्ध झाल्यास अण्वस्त्रे डागण्यासाठी रशियाकडे आता कमी विमाने आहेत. १ जूनच्या युक्रेनियन हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. युक्रेनियन हल्ल्यानंतर लगेचच रशियाने युक्रेनवर ड्रोन लाँच करण्याचा प्रयत्न झाला.
ड्रोन युद्धाचं युग आलाय का?
२०२२ च्या आधीही आर्मेनिया-अझरबैजान संघर्षात आणि सौदी अरेबियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हुथींनी केलेल्या हल्ल्यात याचे संकेत मिळाले होते. ड्रोन हे सर्व संघर्षांचे एक पूरक असल्याचं सिद्ध होतं. रशिया-युक्रेन युद्धाने ड्रोन युद्धाच्या एका नवीन युगाची सुरुवात केली, कारण ड्रोनने लढाऊ विमानांपासून ते लहान शस्त्रांपर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मची जागा घेतली.