'नफरत की बाजारमें मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ' असं वाक्य म्हणत राहुल गांधी यांनी अनेकदा त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये भाषण केलं आहे. एवढंच काय राहुल गांधी हे नुकतेच अमेरिका दौऱ्यावर होते. तिथेही त्यांनी मोदी सरकार हे तिरस्कार पसरवणारं सरकार आहे. त्यांची विचारधारा नथुराम गोडसेची विचारधारा आहे असं म्हटलं होतं. तसंच 'नफरत की बाजारमें मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ' या वाक्याचा पुनुरुच्चारही केला होता. या सगळ्याचा आता भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी जोरदार समाचार घेतला आहे. काय म्हटलं आहे स्मृती इराणींनी? "राहुल गांधीना मी हे विचारु इच्छिते, 'मोहब्बत की दुकान' असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा शिखांचं शिरकाण त्यात सामावून घेता का? राजस्थानात महिलांचं जे अपहरण होतं तो मुद्दाही तुमच्या 'मोहब्बत की दुकान'मध्ये आहे का? हिंदू पद्धतीने आयुष्य जगणाऱ्यांच्या अपमान तुमच्या 'मोहब्बत की दुकान'मध्ये समाविष्ट होतो का? भारताला अस्थिर करणाऱ्यांना साथ देणं तुमच्या 'दुकाना'त समाविष्ट होतं का? देशाबाहेर जाऊन इतर देशांना आपल्या लोकशाहीत ढवळाढवळ करायला सांगणं म्हणजे तुमचं 'मोहब्बत की दुकान' का? हे नेमकं कुठलं प्रेम आहे? " अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती करत स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर कडाडून टीका केली आहे. मोहब्बत की दुकान या राहुल गांधींच्या वाक्यावरुन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राहुल गांधींवर टीका केली होती. राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकान नाही तर तिरस्काराचा शॉपिंग मॉल उघडला आहे असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं होतं. हे पण वाचा “मोहब्बत की दुकान नाही द्वेष आणि तिरस्काराचा मेगा शॉपिंग मॉल”- जे. पी. नड्डा | BJP on Rahul Gandhi काय म्हटलं होतं जे. पी. नड्डा यांनी? “आपला भारत देश जेव्हा जेव्हा प्रगतीची नवी शिखरं गाठतो, जेव्हा जेव्हा भारतातल्या प्रमुखपदावर बसलेल्या व्यक्तीचा लौकिक जगभरात पोहचतो. सगळं जग जेव्हा त्यांना मानतं त्यावेळी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना हे सगळं पचनी पडत नाही. देशाचा गौरव वाढतो आहे हे त्यांना पटत नाही. करोना काळात जगातल्या इतर देशांच्या लसींचं त्यांनी कौतुक केलं. मात्र १०० देशांनी भारताकडून करोना प्रतिबंधक लसी घेतल्या. मात्र राहुल गांधींनी याच लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे राहुल गांधी मागतात, हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करता. वरुन सांगता, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ’ तुम्ही तिरस्कार आणि द्वेषाचा मेगा शॉपिंग मॉल उघडून बसला आहात. अशी टीका नड्डा यांनी केली होती.