Forcing unnatural sex on wife is cruelty: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने एका प्रकरणात असा निर्णय दिला आहे की, पतीने आपल्या पत्नीशी तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे आणि तिने प्रतिकार केला तर तिच्यावर हल्ला करणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८अ (हुंडा मागणी संबंधित कलम) अंतर्गत क्रूरतेच्या व्याख्येत येते.

न्यायमूर्ती गुरपाल सिंह अहलुवालिया यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, “पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे आणि प्रतिकार केला तर तिच्यावर हल्ला करणे हे निश्चितच क्रूरतेच्या व्याख्येत येते. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, फक्त हुंड्याची मागणीच क्रूरतेचे एकमेव कारण असते असे नाही.”

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील पत्नीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, त्यांचे लग्न २ मे २०२३ रोजी हिंदू रितीरिवाजानुसार झाले होते. तिच्या पालकांनी लग्नात पतीला ५ लाख रुपये रोख, घरातील वस्तू आणि एक बुलेट मोटरसायकल दिली होती. लग्नापासून पती दारू पिऊन अनैसर्गिक लैंगिक कृत्ये करत असे आणि नकार दिल्यास मारहाण करत असे. महिला समुपदेशन केंद्र आणि पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, परंतु यानंतरही पतीच्या वागण्यात कोणतीही सुधारणा झाली नाही.

दरम्यान यावेळी पतीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ‘मनीष साहू विरुद्ध मध्य प्रदेश राज्य आणि इतर’ या खटल्याच्या निकालानुसार, कलम ३७५ च्या (बलात्काराचा गुन्हा) व्याख्येनुसार पत्नीशी अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही. त्यामुळे पतीवरील आरोप देखील रद्द केला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर मनीष साहू प्रकरणातील निकालाचा हवाला देत न्यायमूर्ती अहलुवालिया यांनी स्पष्ट केले की, “जर पती-पत्नीमध्ये वैध विवाह असेल आणि पत्नी १५ वर्षांपेक्षा जास्त वयाची असेल, तर पत्नीने संमती दिली नसली तरीही पतीने केलेले लैंगिक संबंध कलम ३७५ च्या अपवाद २ अंतर्गत बलात्कार मानले जाणार नाहीत.”