संयुक्त पुरोगामी आघाडीने मोठा आव आणत आपले प्रगती पुस्तक लोकांसमोर ठेवले असले तरी ते अधोगती लपवणारे प्रगतिपुस्तक आहे, अशी टीका भाजपने बुधवारी केली. सरकारने जेवढे गैरव्यवहार केले आहेत त्यांचा तर नामोल्लेखही या प्रगती पुस्तकात नाही. उलट अनेक गैरव्यवहारांचे खापर भाजपवर फोडण्याचा हास्यास्पद प्रकारही त्यात आहे, असे पक्षप्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. सरकारच्या सोयीचे जेवढे आहे तेवढेच समोर आणण्याची त्यांची धडपड आहे, असेही ते म्हणाले.
भाजपमुळे अन्नसुरक्षा विधेयकासारखी अनेक लोककल्याणकारी विधेयके संसदेत चर्चेलाच येऊ शकली नाहीत, अशी हाकाटी काँग्रेस करीत आहे. प्रत्यक्षात केंद्राच्या अन्नसुरक्षा विधेयकापेक्षा कितीतरी व्यापक असे अन्नसुरक्षा विधेयक आम्ही छत्तीसगढमध्ये आणले आहे. असे विधेयक आणणारा भाजप हा पहिला सत्ताधारी पक्ष ठरला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नऊ वर्षांत अन्नसुरक्षेचे विधेयक आणावे, अशी बुद्धी या सरकारला का झाली नाही, असा सवाल करीत जावडेकर म्हणाले की, आता जाग आलेल्या सरकारला विरोधकांवर दोषारोप करून स्वतचा बचाव करायचा आहे.