जगभरात देशाची मान सन्मानाने उंच करणारे खेळाडू आज त्यांच्यावरील अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, अद्यापही त्यावर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. याविरोधात या कुस्तीपटूंनी राजधानी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर आपलं आंदोलन सुरू केलं आहे. याच मुद्द्यावर अभिनेत्री आणि नेता उर्मिला मातोंडकर यांनी पीडित महिला खेळाडूंना पाठिंबा दर्शवत प्रतिक्रिया दिली. त्यांनी गुरुवारी (२७ एप्रिल) ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “मी आज देशातील प्रत्येक घरातील मुलगी आणि बहिणीच्यावतीने बोलत आहे. अनेक पदकं जिंकून देशाला मान-सन्मान मिळवून देणाऱ्या देशाच्या लेकी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. त्यांच्यावरील अन्यायाविरोधात न्याय मिळावा म्हणून या लेकींनी सुरू केलेल्या जंतरमंतरवरील आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. ज्या देशात महिलेला देवीचा दर्जा दिला आहे अशा देशात त्या मुली न्यायाची भीक मागत आहेत. हे बरोबर आहे का?”

“लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं हे सांगणं कठीण”

“आम्हाला लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं हे सांगणं या मुलींसाठी प्रचंड कठीण असेल. एखादी मुलगी तिच्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवते तेव्हा ही फार मोठी गोष्ट असते. आज या मुली त्यांच्या कुस्तीच्या क्षेत्रातील लैंगिक अत्याचाराविरोधात बोलत आहेत. उद्या हा अत्याचार इतर क्षेत्रात इतर मुलींवरही होऊ शकतो. आज या मुलींना न्याय मिळाला नाही, तर खूप उशीर होईल,” असं मत उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केलं.

“पदक मिळवल्यावर फोटो काढण्यासाठी मागेपुढे पळणारे मंत्री कुठे आहेत?”

उर्मिला मातोंडकर पुढे म्हणाल्या, “मला तुम्हाला सर्वांना विचारायचं आहे की, याच मुली जेव्हा देशासाठी पदकं घेऊन येतात तेव्हा आपण सगळे त्यांचं कौतुक करतो. सगळे मंत्री या पदकविजेत्या खेळाडूंबरोबर फोटो काढून ट्वीट करण्यासाठी त्यांच्यामागेपुढे पळतात. आज ते सगळे मंत्री कुठे आहेत? ते सर्व माध्यमं आज कुठे आहेत?”

हेही वाचा : बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आरोप ‘गंभीर’, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले महत्त्वपूर्ण निर्देश

“मी देशाचे गृहमंत्री अमित शाहांना विनंती करते की…”

“माध्यमं छोटछोट्या गोष्टींना मोठं करून लोकांपर्यंत पोहचवतं. अशावेळी या महिला खेळाडूंवरील अत्याचाराची बातमी मोठी नाही का? या मुली प्रत्येक मुलीसाठी न्याय मागत आहेत. त्यांना देशासमोर आणलं पाहिजे. मी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि क्रीडामंत्री यांना नम्रपणे विनंती करते की, त्यांनी या महिला खेळाडूंना न्याय द्यावा,” अशी मागणी उर्मिला मातोंडकर यांनी केली.

“…तर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या घोषणांना काय अर्थ राहतो?”

यावेळी उर्मिला मातोंडकरांनी जर या महिला खेळाडूंबरोबर उभे राहणार नसाल तर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या घोषणांना काय अर्थ राहतो? असा प्रश्न विचारत मोदी सरकारवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmila matondkar comment on wrestler protest against physical abuse pbs
First published on: 27-04-2023 at 22:59 IST