Titan Submarine Debris : अटलांटिक महासागरात टायटॅनिक या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी टायटन या पाणबुडीतून गेलेल्या अब्जाधीशांचा मृत्यू झाला. टायटन या पाणबुडीचा जो ढिगारा आढळला आहे त्यात मानवी अवशेष सापडले आहेत. टायटन या पाणबुडीचा स्फोट होऊन पाचही प्रवाशांचा त्या घटनेत मृत्यू झाला. समुद्राच्या खोलात उतरून स्फोट झालेल्या पर्यटक पाणबुडी टायटनचे अवशेष किनाऱ्यावर आणणण्यात आले. या पाणबुडीचे अवशेष २८ जून च्या दिवशी कॅनडातील सेंट जॉन्स येथील बंदरात ‘होरायझन आर्टिक’ या जहाजातून उतरवण्यात आले. त्यात मानवी अवशेष आढळल्याचं कोस्ट गार्डने म्हटलं आहे.

डॉक्टर्स करणार मानवी अवशेषांची तपासणी

समुद्राच्या तळाशी जाऊन या पाणबुडीच्या तुकडे, ढिगारा असे अवशेष गोळा केले जात आहेत. अमेरिकेच्या कोस्टगार्डने हे म्हटलं आहे की पाणबुडीच्या तुकड्यांमध्ये आणि ढिगाऱ्यात मानवी अवशेष आढळून आले आहेत. कोस्ट गार्डने दिलेल्या निवेदनानुसार अमेरिकेतले डॉक्टर्स या मानवी अवशेषांची तपासणी करणार आहेत. बीबीसीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

१८ जून रोजी पाणबुडीचा स्फोट

१८ जून रोजी टायटन या पाणबुडीतल्या पाचही जणांचा मृत्यू झाला. ही पाणबुडी टायटॅनिक या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेली होती. मात्र पाणबुडी निघाल्यापासून पुढच्या ९० मिनिटांतच तिचा संपर्क तुटला होता. १२ हजार फुटांपेक्षा जास्त खाली असलेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ही पाणबुडी गेली होती. या पाणबुडीचा संपर्क तुटल्यानंतर पुढचे सुमारे तीन दिवस शोध मोहीम सुरु होती.

या पाणबुडीमध्ये ब्रिटीश उद्योगपती हमिश हार्डिंग, पाकिस्तानी गुंतवणूकदार शाहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान, फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट आणि ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश यांचा समावेश होता.

हमिश हार्डिंग

हमिश हार्डिंग हे अॅक्शन एव्हिएशन या विमान विक्री आणि कन्सल्टिंग कंपनीचे अध्यक्ष होते. नासाचे निवृत्त अंतराळवीर टेरी व्हर्ट्स यांनी त्यांचे मित्र हार्डिंग यांच्याबद्दल माहिती दिली. हार्डिंग यांनी २०१९ मध्ये पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांभोवती सर्वात वेगवान उड्डाण करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. ज्यामध्ये टेरी व्हर्ट्स क्रू मेंबर म्हणून त्यांच्यासोबत होते.

स्टॉकन रश

ब्रिटीश व्यावसायिक असलेल्या स्टॉकन रश यांनी २००९ मध्ये ओशन गेट नावाच्या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी महासागराच्या पृष्ठभागाखाली २० हजार फुटांपर्यंत प्रवास करू शकणार्‍या पाणबुडीची निर्मिती करते. १९८१ मध्ये, वयाच्या १९ व्या वर्षी रश हे जगातील सर्वात तरुण जेट ट्रान्सपोर्ट-रेट केलेले पायलट बनले होते. त्यांनी कैरो, मुंबई आणि झुरिच सारख्या ठिकाणांवर उड्डाण केलं होतं. त्यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतून एरोस्पेस इंजिनीअरिंगची डिग्री आणि यूसी बर्कले येथून बिझनेस मास्टर्स डिग्री घेतली होती.

पॉल-हेन्री नार्गोलेट

पॉल-हेन्री नार्गोलेट यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला, पण ते कुटुंबासह १३ वर्षे आफ्रिकेत राहिले आणि नंतर पुन्हा फ्रान्सला गेले होते. जहाजांबद्दल असलेलं ज्ञान आणि कौशल्यामुळे पॉल-हेन्री नार्गोलेट ‘मिस्टर टायटॅनिक’ म्हणून ओळखले जायचे. फ्रेंच नौदलात २२ वर्षे सेवा करणाऱ्या नार्गोलेट यांना कमांडरपद मिळालं होतं. १९८६ मध्ये नौदलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी ‘फ्रेंच इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड एक्स्प्लॉयटेशन ऑफ द सी’ इथे दोन डीप-सी सबमर्सिबलची देखरेख केली. तिथे असतानाच त्यांनी टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत फर्स्ट रिकव्हरी डाईव्ह केली होती.

शहजादा दाऊद

शहजादा दाऊद हे पाकिस्तानी ऊर्जा गुंतवणूक कंपनी एनग्रो तसेच दाऊद हर्क्युलस कॉर्प या दोन कंपन्याचे उपाध्यक्ष होते. त्यांनी SETI इन्स्टिट्युट, नानफा संस्था, प्रिन्स चार्ल्सची धर्मादाय संस्था, प्रिन्स ट्रस्ट इंटरनॅशनल अशा विविध कंपन्या आणि संस्थाच्या बोर्डमध्ये काम केलं होतं. त्यांनी यूकेमधील बकिंगहॅम युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी आणि फिलाडेल्फिया विद्यापीठातून ग्लोबल टेक्सस्टाईल मार्केटिंग विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं होतं. टायटॅनिकचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सुलेमानही गेला होता. त्याचाही मृत्यू झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुलेमान दाऊद

शहजादा दाऊद यांचा १९ वर्षांचा मुलगा सुलेमान हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. त्याने स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मेजरचं पहिलं वर्ष पूर्ण केलं होतं. तोही वडिलांबरोबर टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेला होता. वडिलांबरोबर सुलेमानचाही या मोहिमेत मृत्यू झाला.