Donald Trump On Elon Musk Political Party : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. ‘बिग ब्युटीफुल बिल’ हे विधेयक अमेरिकेत मंजूर झाल्यामुळे एलॉन मस्क यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हे विधेयक मंजूर झाल्यास आपण थेट राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत मस्क यांनी दिले होते. त्यानंतर शनिवारी एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा करत ‘अमेरिका पार्टी’ची घोषणा केली. त्यामुळे मस्क हे त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून राजकीय मैदानात उतरत ट्रम्प यांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

एलॉन मस्क यांनी राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत ‘अमेरिका पार्टी’ची खिल्ली उडवली आहे. तसेच तिसरा पक्ष सुरू करणं हास्यास्पद असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. तसेच अमेरिकेत तिसरा पक्ष कधीही यशस्वी होत नसल्याचंही ते म्हणाले आहेत. या संदर्भात ट्रम्प यांनी न्यू जर्सी गोल्फ क्लबमधून वॉशिंग्टनला परतत असताना पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. तसेच ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्या या निर्णयाबाबत ‘ट्रुथ सोशल’ माध्यमावरही प्रतिक्रिया दिली. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

“मला वाटतं की तिसऱ्या पक्षाची सुरुवात करणं हास्यास्पद आहे. अमेरिकेत नेहमीच द्विपक्षीय व्यवस्था राहिली आहे. त्यामुळे मला वाटतं की तिसरा पक्षाची घोषणा केल्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पक्षाने कधीही काम केलेलं नाही. पण एलॉन मस्क हे मनोरंजनासाठी पक्ष तयार करू शकतात, हे मला हास्यास्पद वाटतं”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

‘अमेरिकेत तिसरा पक्ष कधीही यशस्वी होत नाही’

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे असंही म्हटलं की, “एलॉन मस्क यांना तिसरा राजकीय पक्ष सुरू करायचा आहे. पण अमेरिकेत तिसरा पक्ष कधीही यशस्वी होत नाही. त्यामुळे यावरून असं दिसतं की तिसऱ्या पक्षासाठी फक्त एकच गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे फक्त व्यत्यय आणणं आणि गोंधळ निर्माण करणं”, असं ट्रम्प यांनी म्हटलं. तसेच ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर टीका करताना ‘ट्रेनक्रॅक’ असं संबोधत ते पट्रीवरून घसरल्याचं म्हणत मस्क यांच्यावर टीका केली.

एलॉन मस्क यांच्या पक्षाचं नाव काय आहे?

मस्क यांनी शनिवारी त्यांच्या एक्स (ट्विटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत अमेरिकेत ‘अमेरिका पार्टी’ नावाच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्याच्या संदर्भात त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून अमेरिकन लोकांचा कौल देखील घेतला होता. त्यामध्ये त्यांना लाखो लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मस्क यांची ‘अमेरिका पार्टी’ पक्षाची घोषणा केली.

ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वादाचं कारण काय?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘बिग ब्युटीफुल बिल’ हे विधेयक आणलं. आता नुकतंच हे विधेयक अमेरिकन सीनेटमध्ये मंजूर देखील झालं. हे विधेयक ट्रम्प यांचं महत्त्वकाक्षी असल्याचं मानलं जातं. मात्र, याच विधेयकाला मस्क यांनी विरोध दर्शवला होता, तसेच यावरूनच ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद झाल्याचं बोललं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मस्क आता ट्रम्प यांना आव्हान देणार?

खरं तर ट्रम्प आणि मस्क हे दोन्हीही अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वं आहेत. दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठलेली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात ऐतिहासिक पुनरागमन केलं, तर एलॉन मस्क यांनी ४२० अब्ज नेटवर्थसह तंत्रज्ञान, अवकाश, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रिक वाहन अशा अनेक उद्योगांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केलं. विशेष म्हणजे या दोघांकडेही स्वत:च्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. ट्रम्प यांच्याकडे ‘ट्रुथ सोशल’, तर इलॉन मस्क यांचे जगभरात ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आहे. दोघेही आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून एकमेकांवर कोरडे आसूड ओढत आहेत. यातच आता मस्क हे राजकीय मैदानात उतरणार असल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. यातच आता मस्क हे ट्रम्प यांना राजकीय मैदानात आव्हान देण्याची शक्यता आहे.