Explosion At Elon Musk’s SpaceX Base During Starship Testing: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला मोठा धक्का बसला असून, बुधवारी टेक्सासमधील मॅसी येथील स्टारबेस चाचणी स्थळी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झाला. स्टारशिप ३६ नावाच्या या सुपर रॉकेटच्या स्थिर अग्निचाचणीदरम्यान हा स्फोट झाला. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी रॉकेटचे इंजिन जमिनीवर चाचणीसाठी सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चाचणी सुरू झाल्यानंतर काही सेकंदांतच रॉकेटचा समोरील भाग अचानक फुटला, ज्यामुळे शक्तिशाली स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका जोरदार होता की आसपास असलेल्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा हादरल्या. सर्वत्र कंपने जाणवली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. चाचणी स्थळ रिमोट ऑपरेशनद्वारे चालवले जात असल्यामुळे आणि सर्व कर्मचारी सुरक्षित अंतरावर असल्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

ही स्टारशिप ३६ ची फ्लाइट १० साठी शेवटची चाचणी होती, ज्याचे प्रक्षेपण २९ जून रोजी होणार होते. स्थिर अग्निचाचणीमध्ये रॉकेटचे इंजिन जमिनीवर पूर्ण शक्तीने चालवले जाते, जेणेकरून प्रक्षेपणापूर्वी प्रणालीची चाचणी करता येईल. मात्र, यावेळी चाचणी अयशस्वी ठरली आणि स्फोटामुळे रॉकेटचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, स्पेसएक्सनेही याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये स्पेसएक्सने म्हटले आहे की, “बुधवार, १८ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, १०व्या फ्लाइट उड्डाण चाचणीची तयारी दरम्यान मोठा स्फोट झाला. संपूर्ण ऑपरेशनदरम्यान साइटभोवती एक सुरक्षित अंतर राखण्यात आले होते, त्यामुळे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.”

यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, “आमची स्टारबेस टीम स्थानिक अधिकाऱ्यांसोबत चाचणी स्थळ आणि आसपासच्या परिसराच्या सुरक्षिततेसाठी सक्रियपणे काम करत आहे. परिसरातील नागरिकांना कोणताही धोका नाही आणि आम्ही विनंती करतो की सुरक्षा ऑपरेशन्स सुरू असताना नागरिकांनी त्या क्षेत्राकडे जाण्याचा प्रयत्न करू नये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला प्रक्षेपणानंतर लगेचच दोन स्टारशिप चाचणी उड्डाणे स्फोटात नष्ट झाली होती. यातील एक रॉकेट कॅरिबियन समुद्रावर फुटले होते आणि दुसरे अटलांटिक महासागरावर नियंत्रणाबाहेर गेले होते.