भारतीय वंशाच्या तिसऱ्या अवकाश वीरांगनेचे मनोगत

ह्य़ूस्टन : भारताचे पहिले अवकाशवीर राकेश शर्मा जेव्हा अवकाशात गेले होते तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे उत्तर, अवकाशातून भारत कसा दिसतो, या प्रश्नावर दिले होते. त्यानंतर आता कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशाचा वेध घेणाऱ्या सिरिषा बांदला  हिने अवकाशातून पृथ्वीचे दर्शन जीवन बदलवून टाकणारे व अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे.

व्हर्जिन गॅलेक्टिकच्या वतीने सोडण्यात आलेल्या अवकाश यानातून बांदेला हिने पृथ्वी अवकाशातून कशी दिसते याचे अवलोकन केले.

ब्रिटिश अब्जाधीश व कंपनीचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासह एकूण पाच प्रवासी ‘युनिटी’ या अवकाश यानात होते.

न्यू मेक्सिको येथून या यानाचे उड्डाण झाले होते. न्यू मेक्सिको वाळवंटात ८८ कि.मी उंचीवर यान गेले होते, तेथून पृथ्वीची वक्रता स्पष्ट दिसते. या वेळी त्यांनी काही मिनिटे शून्य गुरुत्वाचा अनुभवही घेतला.

एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत बांदला हिने सांगितले, की अजूनही मी अवकाशात असल्यासारखेच वाटते आहे. तेथे गेल्यानंतर मला आनंद झाला.‘ इनक्रेडिबल’ हा शब्द अपुरा पडावा असा अनुभव मला आला. पृथ्वीचे दर्शन अवकाशातून घेण्याचा हा सोनेरी क्षण अविस्मरणीय होता. या अवकाशवारीने जीवनच बदलून गेले. येथून अवकाश व अवकाशातून पृथ्वीवर परत येणे या सगळ्या काळात आनंदाची परमावधी गाठली गेली. अतिशय उत्कंठावर्धक असा हा प्रवास होता.

बांदला हिने सांगितले, की काही क्षण भावविवश करणारे असतात तसा हा अनुभव होता. तरुण असतानापासून अवकाशात जाण्याचे स्वप्न मी पाहत होते व आता ते पूर्ण झाले आहे. मला अवकाशवीरांगना व्हायचे होते, पण नासाच्या व्यवस्थेत मी जाऊ शकले नाही. त्यामुळे अपारंपरिक मार्ग मी अवकाशात जाण्यासाठी निवडला. अनेक लोकांना तेथे गेल्यावर हाच अनुभव येईल.

बांदला हिची दृष्टी काहीशी कमी असल्याने ती नासाच्या अवकाशवीरांच्या निकषात बसत नव्हती.  तिने सांगितले, की व्हीएएस युनिटीचे उड्डाण आज पाच  जणांना अवकाश दर्शन घडवणारे ठरले. पण आणखी दोन अवकाशयाने उत्पादन पातळीवर आहेत. जसे तंत्रज्ञान जास्त वापरले जाते, तसा खर्च कमी होतो, त्याप्रमाणे अवकाश प्रवासाचा खर्च कमी होईल यात शंका नाही.