पश्चिम बंगालच्या संदेशखली येथे गेल्या अनेक दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांना संदेशखलीचा दौरा करण्यापासून रोखण्यात आले होते. यावरुन आता पश्चिम बंगालच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात बोलत असताना टीका केली आहे. “इस्रायलमध्ये हमासने जे केले, ते पश्चिम बंगालमध्ये होत आहे. संदेशखलीमध्ये अग्नितांडव होत आहे. महिलांना छळाचा सामना करावा लागतोय. पश्चिम बंगालची वाताहत होण्याची सुरुवात डाव्या पक्षांच्या राज्यात झाली. मग मार्क्सवादी, माओवादी, तुकडे तुकडे गँग ते सीपीआय (एम) ने राज्याची ही अवस्था केली आहे”, असेही सुवेंदू अधिकारी म्हणाले.
विश्लेषण : संदेशखाली प्रकरण काय आहे? यावरून ममता-भाजप संघर्ष का उडाला?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सुवेंदू अधिकारी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आता ममता दीदी म्हणणे सोडून दिले पाहीजे, त्या आता काकू झाल्या आहेत. मी त्यांचा नंदीग्राम विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. तेव्हा त्यांनी माझ्याविरोधात ४२ खटले दाखल केले होते. इस्रायलमध्ये हमासने जे केले, तेच आज पश्चिम बंगालमध्ये होत आहे.
सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, यापुढे पश्चिम बंगालमध्ये डबल इंजिनचे सरकार स्थापन होईल. यासाठी अधिकारी यांनी एक घोषणा दिली. “संदेशखली, ममता की कुर्सी करेगी खाली”, अशी घोषणा देताना अधिकारी म्हणाले की, ममता बॅनर्जी या किम जोंग उनचं भारतातील छोटं रुप आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्या घोषणा बांगलादेशमधून येतात, अशीही टीका त्यांनी केली.
राष्ट्रपती राजवटीची शिफारस; पश्चिम बंगालमधील हिंसाचारप्रकरणी ‘एनसीएससी’चा अहवाल सादर
भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार हेदेखील जेएनयू मधील कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनीही मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ममता बॅनर्जी आणि भारतविरोधी घटकांचा खोलवर संबंध असल्याचे ते म्हणाले. संदेशखली मधील महिलांच्या प्रतिक्रियेचा हवाला देऊन सुकांता मजुमदार म्हणाले की, शेख शहाजानने हिंदू महिलांवर अत्याचार केले. तो जानेवारी महिन्यापासून बेपत्ता आहे. फक्त पश्चिम बंगालमधील पोलिसांनाच त्याचा ठावठिकाणा माहीत आहे.
इस्रायल किंवा पॅलेस्टाईनमध्ये एखादा हल्ला झाला की, भारतात निदर्शने केली जातात. पण आता पश्चिम बंगालच्या परिस्थितीबाबत हेच लोक शांत का बसले आहेत? असाही सवाल मुजूमदार यांनी उपस्थित केला.
शेखला अद्याप अटक का नाही? संदेशखली प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
संदेशखली प्रकरण काय आहे?
पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखली या गावात काही महिलांवर सामूहिक अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा आरोप आहे. यावरून राज्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्यात संघर्ष सुरू आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत ते तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचे भाजपने नमूद केले. ही घटना गंभीर असून, विविध तपास संस्थांद्वारे चौकशी केली जातेय. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजान शेख बेपत्ता आहे तर दोघांना अटक करण्यात आलीय. कोलकात्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावरील हे गाव संघर्षाचा केंद्रबिंदू ठरतेय.