Piyush Goyal On India US Tariff Tension : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेत व्यापार तणाव निर्माण झालेला आहे. या तणावाचं कारण म्हणजे अमेरिकेने भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलेलं आहे. एवढंच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर टीका करत आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफसमोर भारत कधीही झुकणार नाही अशी भूमिका भारताने घेतलेली आहे.
या सर्व घडामोडीनंतर अद्यापही भारत-अमेरिकेत व्यापार तणाव कायम आहे. मात्र, हा तणाव कधी कमी होईल? यावर आता भारताचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मोठं विधान केलं आहे. मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी सांगितलं की, ‘भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात सुरू आहे आणि या चर्चेत प्रगती होत आहे’, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारत-अमेरिकेतील व्यापार करार कधी होईल? याची थेट तारीख सांगण्यास पीयूष गोयल यांनी नकार दिला. तसेच भारत-अमेरिकेतील टॅरिफबाबत भारताला गूड न्यूज कधी मिळेल? असा प्रश्न पीयूष गोयल यांना विचारण्यात आला. यावर पीयूष गोयल यांनी म्हटलं की, “दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा सुरू आहेत.” या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त शुल्काबाबत विचारलं असता पीयूष गोयल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “जेव्हा यासंबंधीच्या निर्णयाबाबत एकमत होईल, तेव्हा माध्यमांना त्याबाबत माहिती दिली जाईल.”
‘दोन्ही देशांतील व्यापार चर्चा सकारात्मक’ : पीयूष गोयल
मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं की, “दोन्ही देशांत वाटाघाटी अतिशय सकारात्मक वातावरणात सुरू आहे आणि चर्चेत प्रगती होत आहे. मी यापूर्वीही अनेक वेळा सांगितलं आहे की मुक्त व्यापार करार किंवा व्यापार वाटाघाटी कधीही अंतिम मुदतीसह पूर्ण होत नाहीत. अमेरिकेशी कोणताही करार राष्ट्रीय हिताचा आहे, याची पुष्टी झाल्याशिवाय केला जाणार नाही. देशातील शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्राचं हित लक्षात घेतलं जाईल.”