काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे पुन्हा एकदा केरळच्या तिरुवनंतपुरममधून लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी दौरे करत असताना त्यांना माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे आश्चर्य वाटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय कोण आहे? असा प्रश्न थरूर यांना विचारण्यात आला. यानंतर थरूर यांनी हा प्रश्न फेटाळून लावला आणि लोकशाहीत असा प्रश्न अवाजवी असल्याचे म्हटले. भाजपाकडूनही निवडणुकीदरम्यान असाच युक्तिवाद करण्यात येत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना असलेला नेता विरोधकांकडे नाही, असा युक्तीवाद करण्यात येत असतो. थरूर यांनी यानिमित्ताने या प्रश्नाचे उत्तर दिले.

आपल्या देशाच्या लोकशाहीत आपण एका व्यक्तीला नाही तर पक्षाला किंवा पक्षांच्या आघाडीला निवडतो, असे थरूर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्याय हा अनुभवी, सक्षम आणि विविध नेत्यांचा समूह आहे. हा समूह लोकांच्या समस्याप्रती उत्तरदायी तर आहेच शिवाय वैयक्तिक अंहकारापासूनही विलुप्त असेल.

थरूर यांनी एक्स या साईटवर पोस्ट टाकत म्हटले, “पत्रकारांनी मला पुन्हा एकदा विचारले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय काय असेल. संसदीय प्रणालीमध्ये हा प्रश्नच गैरलागू होतो. आपल्याकडे राष्ट्राध्यक्ष पद्धत नाही. आपण पक्षाला किंवा पक्षांच्या समूहाला निवडून देतो. हे पक्ष भारताची विविधता, संस्कृती जोपासत सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने आपली पावले टाकतात.”

पंतप्रधान पदाच्या निवडीबद्दल बोलताना शशी थरूर म्हणाले की, लोकशाही आणि विविधता टिकवणे हे आपले पहिले ध्येय आहे. त्या तुलनेत फक्त पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडणे हे दुय्यम ध्येय आहे.

शशी थरूर हे चौथ्यांदा तिरुवनंतपुरम येथून निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात भाजपाचे नेते राजीव चंद्रशेखर आणि डाव्या आघाडीचे नेते पन्यन रवींद्रन लढत देत आहेत. थरूर सध्या प्रचारासाठी जोरदार दौरे करत आहेत. तिरुवनंतपुरम येथे २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.