Who Is Rakesh Kishor who Threw Shoes At CJI B. R. Gavai: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात एका ७१ वर्षीय वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपी वकिलाचे नाव राकेश कुमार असे असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर, आरोपी वकील राकेश कुमार यांची सुटका करण्यात आली आहे.
कोण आहेत राकेश किशोर?
पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरात राहतात. त्यांनी २००९ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. ज्येष्ठ वकील असलेले राकेश किशोर हे अनेक वर्षांपासून विविध बार असोसिएशन्सचे सदस्य राहिले आहेत. पोलिसांना राकेश किशोर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार कौन्सिलचे सदस्यत्व कार्ड असल्याचे आढळले, असे वृत्त बार अँड बेंचने दिले आहे.
प्रत्येक सनातनीसाठी…
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी वकील राकेश किशोर यांच्या ताब्यातून एक चिठ्ठी जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिठ्ठीत लिहिले होते, “माझा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे. हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” चौकशीदरम्यान या वकिलाकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार कौन्सिलची सदस्यत्व कार्ड असल्याचेही पोलिसांना आढळले.
पोलीस काय म्हणाले?
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मयूर विहार येथील रहिवासी आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य किशोर यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकल्यानंतर त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक केली आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा विभागाकडे सोपवले होते. त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीदरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्यांना सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्यामागचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर संकुलात भगवान विष्णूंची मूर्ती पुन्हा बसवण्याच्या मागणीच्या याचिकेवरील अलिकडच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर गवई यांनी केलेल्या टिप्पणीवर ते नाराज असल्याचा दावा केला आहे.