Who will succeed Ayatollah Ali Khamenei: इराण-इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला असून सहा दिवसानंतरही यातून तोडगा निघालेला नाही. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. जर खामेनी यांना ठार केले तर दोन्ही देशांमध्ये बऱ्याच काळापासून चालू असलेला तणाव निवळू शकेल, असे इस्रायलला वाटते.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनीही अशाच प्रकारचा इशारा दिला आहे. इराकचे माजी नेते सद्दाम हुसैन यांच्याप्रमाणेच खामेनी यांची अवस्था होऊ शकते, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, जी७ समिटच्या काही तासानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या सर्वोच्च नेत्यांना धमकी दिली. ट्रम्प म्हणाले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी कुठे लपून बसले आहेत, त्याचा ठावठिकाणा आमच्याकडे आहे. आम्ही त्यांना तिथे मारू शकतो. पण सध्या आम्ही ते करणार नाही.
जर खामेनी यांचा अचानक मृत्यू झाला तर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल?
१. मोज्तबा खामेनी
मोज्तबा खामेनी हे अयातुल्ला अली खामेनी यांचे द्वितीय पुत्र आहेत आणि कदाचित ते त्यांचे उत्तराधिकारी असतील. १९६९ मध्ये जन्मलेले मोज्तबा यांचा इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि इराणची धर्मगुरू संस्था स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा होता. ते सध्या मध्यम श्रेणीतील धर्मगुरू आहेत. त्यांचा इराणच्या प्रशासनावर मोठा प्रभाव आहे.
२. अलिरेझा अराफी
अलिरेझा अराफी हे खामेनी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. सध्या ते महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. इराणच्या उर्जा क्षेत्राचे त्यांचे ज्ञान आणि समज अधिक असल्याचे बोलले जाते.
३. अली असगर हेजाझी
अली असगर हेजाझी हे खामेनी यांच्या कार्यालयाची राजकीय सुरक्षा बाबी पाहतात. प्रशासनातील महत्त्वाच्या भूमिकेत ते अनेकदा दिसतात. इराणच्या गुप्तचर विभागावरही त्यांची देखरेख असते. संरक्षण आणि रणनीतीच्या बाबतीत निर्णय घेण्यांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते.
४. मोहम्मद गोलपायगानी
खामेनी यांच्या कार्यालयात चीफ ऑफ स्टाफ या पदावर मोहम्मद गोलपायगानी हे बऱ्याच काळापासून काम करत आहेत. तसेच खामेनी यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी ते एक आहेत.
५. तज्ञांची सभा
इराणी संविधानाने तज्ज्ञांच्या सभेला उत्तराधिकारी ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. दर आठ वर्षांनी निवडून येणाऱ्या वरिष्ठ धर्मगुरूंच्या ८८ सदस्यीय मंडळाने गुप्तपणे चर्चा करून एकाच सर्वोच्च नेत्याऐवजी नेतृत्व परिषद गठीत करण्याची मुभा संविधानात देण्यात आलेली आहे.
इस्रायलने दिलेल्या धमक्यांना अयातुल्ला अली खामेनी यांनी जराही भीक घातलेली नाही. याउलट झायोनिस्ट राजवटीला नष्ट करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.