Elon Musk Political Party : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ट्रम्प आणि मस्क हे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप आणि टीका करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. खरं तर ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मस्क यांची महत्वाची भूमिका राहिल्याचं मानलं जातं. एवढंच नाही तर ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू म्हणून मस्क यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण मागील काही दिवसांत मस्क आणि ट्रम्प यांचा वाद जगभरात चर्चेचा विषय ठरला.

डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या वादाचं मूळ कारण म्हणजे अमेरिकत नुकतच मंजूर झालेलं ‘बिग ब्युटीफुल बिल’ हे विधेयक. याच विधेयकावरून ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मतभेदाला सुरूवात झाली. त्यामुळे आता एलॉन मस्क यांनी आज (६ जुलै) एक मोठी घोषणा करत नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. आता मस्क हे ट्रम्प यांना थेट राजकीय मैदानात आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. राजकीय पक्षाची घोषणा केल्यामुळे मस्क यांना स्वत:च सरकार व्हायचंय का? असाही सवाल विचारला जात आहे. पण मस्क यांनी स्वत:चा स्वतंत्र पक्ष का काढला? याची कारणं काय आहेत? हे थोडक्यात जाणून घेऊयात.

एलॉन मस्क यांची नवीन राजकीय पक्षाची घोषणा

मस्क यांनी शनिवारी त्यांच्या एक्स (ट्विटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत अमेरिकेत ‘अमेरिका पार्टी’ नावाच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. तसेच काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्याच्या संदर्भात त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून अमेरिकन लोकांचा कौल देखील घेतला होता. त्यामध्ये त्यांना लाखो लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आज एलॉन मस्क यांची ‘अमेरिका पार्टी’ पक्षाची घोषणा केली.

ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वादाचं कारण काय?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला दिलेल्या काही प्रमुख आश्वासनांच्या आधारे दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. यातील काही आश्वासने, जसे की विविध देशांमधून आयातीवर शुल्क लादणे, कार्यकारी आदेशांद्वारे अंमलात आणता येतात. या पार्श्वभूमीवरच डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘बिग ब्युटीफुल बिल’ हे विधेयक आणलं. आता नुकतंच हे विधेयक अमेरिकन सीनेटमध्ये मंजूर देखील झालं. हे विधेयक डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्त्वकाक्षी असल्याचं मानलं जातं. मात्र, याच विधेयकाला मस्क यांनी विरोध दर्शवला होता आणि ट्रम्प यांच्यावर त्यांनी टीका केली होती.

‘हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचं आणि विध्वंसक’ : मस्क

एलॉन मस्क यांनी म्हटलं होतं की, “या विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील आणि देशाचं मोठं आर्थिक व धोरणात्मक नुकसान होईल. इतकंच नाही तर मस्क यांनी हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचं आणि विध्वंसक आहे असं म्हटलं होतं. माफ करा, परंतु मी आता हे सहन करू शकत नाही. काँग्रेसचं हे हास्यास्पद, घृणास्पद आणि महागडं विधेयक आहे.ज्या लोकांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी चूक केली आहे”, असं मस्क यांनी म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी दिले होते राजकीय पक्षाचे संकेत

ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर काही दिवसांपूर्वी मस्क यांनी थेट राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते. मस्क यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यामध्ये त्यांनी जनतेचा पोल घेतला होता. त्यामध्ये मस्क यांनी असं म्हटलं होतं की, “अमेरिकेत ८० टक्के मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे का?”. तसेच या प्रश्नावर अगदी ८० टक्के लोक सहमत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. याबरोबरच ही पोस्ट शेअर करत द अमेरिका पार्टी असं सूचक नवीन नावही त्यात सूचवलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मस्क आता राजकीय मैदानात ट्रम्प यांना आव्हान देणार?

खरं तर ट्रम्प आणि मस्क हे दोन्हीही अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वं आहेत. दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठलेली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात ऐतिहासिक पुनरागमन केलं, तर एलॉन मस्क यांनी ४२० अब्ज नेटवर्थसह तंत्रज्ञान, अवकाश, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रिक वाहन अशा अनेक उद्योगांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांकडेही स्वत:च्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. ट्रम्प यांच्याकडे ‘ट्रुथ सोशल’, तर इलॉन मस्क यांचे जगभरात ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आहे. दोघेही आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून एकमेकांवर कोरडे आसूड ओढत आहेत. यातच आता मस्क हे राजकीय मैदानात उतरणार असल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद आणखी वाढण्याची चिन्हं निर्माण झालं असून मस्क आता ट्रम्प यांना राजकीय मैदानात आव्हान देण्याची शक्यता आहे.