दोन्ही काँग्रेस नेत्यांनी मेहनतीने मुख्यमंत्रिपद मिळवले
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. वाय. एस. राजशेखर रेड्डी आणि पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची आजच शपथ घेतलेले अमिरदर सिंग या काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बरेच साम्य आहे. दोन्ही नेत्यांनी निवडणुकांच्या अगोदर वर्षभर मेहनत करून पक्षाला यश मिळवून दिले.
पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी दुसऱ्यांदा निवड झालेल्या अमिरदर सिंग यांनी गेले वर्षभर तयारी केली होती. जानेवारी २०१६ पासून त्यांनी पंजाबमध्ये दौरे सुरू केले. विविध भागांना भेटी देत तत्कालीन अकाली दल सरकारच्या विरोधात वातावरण तापविले. ‘कॉफी विथ कॅप्टन’ या कार्यक्रमांतर्गत त्यांनी युवकांशी संवाद साधला. अकाली दल सरकारच्या विरोधात नाराजी होती. पण आम आदमी पार्टीचे आव्हान उभे ठाकल्याने अमिरदर सिंग यांना अकाली दल आणि आम आदमी पक्ष, असा दुहेरी सामना करावा लागला.
अकाली दल सरकारच्या नाराजीच्या विरोधातील मते ही काँग्रेस आणि आम आदमी पार्टीत विभागली जाणार होती. काँग्रेसच्या विरोधातील नकारात्मक भूमिका तसेच आम आदमी पार्टीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावर अमिरदर सिंग यांनी मात केली. अमिरदर सिंग यांच्याकडे नेतृत्व सोपविल्यानेच पंजाबमध्ये काँग्रेसचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला.
आंध्र प्रदेशात २००४ मध्ये वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला अशाच पद्धतीने यश मिळवून दिले होते. तेव्हा चंद्राबाबू नायडू यांचे आंध्रत प्रस्थ होते. चंद्राबाबूंचा तेव्हा पराभव अशक्य वाटत होता. पण अमिरदर सिंग यांच्याप्रमाणेच राजशेखर रेड्डी यांनी वर्षभर आधी आंध्र पादाक्रांत केला होता. चंद्राबाबूंनी शहरी भागावर लक्ष केंद्रित केल्याने राजशेखर रेड्डी यांनी ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले होते. त्याचा फायदा निवडणुकीत झाला आणि चंद्राबाबूंना लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये (२००४ आणि २००९) राजशेखर रेड्डी यांच्यासमोर पराभव स्वीकारावा लागला होता. राजशेखर रेड्डी यांच्या विमान अपघातातील निधनाने आंध्रतील राजकीय समीकरणे बदलली.
काँग्रेसने प्रादेशिक पातळीवरील नेत्यांना ताकद दिल्यास त्याचा निवडणुकीत फायदा होतो, असे निरीक्षण अमिरदर सिंग यांनी विजयानंतर व्यक्त केले होते. स्थानिक नेतृत्व सक्षम असल्यास किंवा नेत्याबद्दल चांगली प्रतिमा असल्यास त्याचा फायदा होतो. राजशेखर रेड्डी, अमिरदर सिंग, शीला दीक्षित, तरुण गोगाई, इबोबी सिंग आदी काँग्रेस नेत्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. महाराष्ट्रात मात्र कोणत्याही काँग्रेस नेत्याला तशी संधी पक्षाकडून मिळाली नाही. राज्याचे सर्वाधिक काळ नेतृत्व केलेल्या विलासराव देशमुख यांच्या मनात एक शल्य कायम राहिले. आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविता आली नाही हे ते नेहमी बोलून दाखवीत. पंजाबचा कौल लक्षात घेता राज्यातही काँग्रेसला आक्रमक नेत्याकडे पक्षाची सूत्रे सोपविण्याची आवश्यकता आहे.
अकाली दल सरकारच्या नाराजीच्या विरोधातील मते ही काँग्रेस आणि आम आदमी पार्टीत विभागली जाणार होती. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेस आणि अकाली दलाला आव्हान दिले होते. काँग्रेसच्या विरोधातील नकारात्मक भूमिका तसेच काँग्रेस घसरता जनाधार यामुळे आम आदमी पार्टीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावर मात करीत अमिरदर सिंग यांनी अकाली दलाच्या विरोधातील मते काँग्रेसकडे वळविण्याचे आव्हान लीलया पार पाडले.