Yogi Adityanath : दिल्ली विधानसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात पार पडते आहे. प्रचाराची रणधुमाळी पेटली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेला संबोधित करताना दिल्लीत सत्ताधारी असलेली आम आदमी पार्टी म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे असा आरोप केला आहे. तसंच बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट आधार आपने बनवून दिले असाही आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

दिल्लीतल्या आपच्या सरकारने बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना बनावट आधार कार्ड तयार करुन दिले आहेत. त्यांना दिल्लीत स्थायिक करता यावं म्हणून आम आदमी पार्टीने हे पाप केलं आहे. अरविंद केजरीवाल हे आप पक्षाचे संस्थापक आहेत त्यांच्या नेतृत्वात हा पक्ष घुसखोरांचं लांगुलचालन करतो आहे. या पक्षाला निवडून देण्यापेक्षा भाजपाचा पर्याय निवडला पाहिजे असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

भ्रष्टाचार आणि अराजक यांचं प्रतीक म्हणजे आप

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, आप हा पक्ष भ्रष्टाचार आणि अराजक यांचं प्रतीक आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे दिल्लीचा चेहरा बदलण्याची, विकास करण्याची संधी होती. मात्र त्यांनी त्याचा उपयोग केला नाही. आता भाजपाच्या डबल इंजिन सरकारला निवडा म्हणजे दिल्लीचा विकास होईल असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

आपने चांगल्या प्रकल्पांनाही विरोध दर्शवला-योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ म्हणाले, दिल्लीतल्या आपच्या सरकारने दिल्ली मेरठ द्रुतगती महामार्ग आणि दिल्ली ते मेरठ रॅपिड रेल्वे प्रकल्प या दोन प्रकल्पांना सहकार्य करण्यास नकार दिला. दिल्लीतले लोक आता चांगल्या पायाभूत सुविधांसाठी दिल्ली सोडून गाझियाबाद आणि नोएडा या ठिकाणी जात आहेत असाही आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. आप आणि काँग्रेस या पक्षाचे लोक वक्फ बोर्डाला प्रोत्साहन देत आहेत. वक्फ माफियांवर आम्ही चाप लावत आहोत हे यांना नको आहे. जिकडे रुमाल ठेवाल ती वक्फची मालमत्ता हे धोरण भाजपा चालू देणार नाही. त्यामुळेच आता आपला आणि काँग्रेसला या लोकांपुढे कसं संकट निर्माण झालं आहे याची चिंता आहे असाही टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यमुना नदीच्या प्रदुषणाबाबत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

दिल्लीतल्या यमुना नदीच्या प्रदुषणावरुनही योगी आदित्यनाथ यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांमध्ये थोडीशी जरी नैतिकता असती तर त्यांनी सरकारमधल्या मंत्र्यांसह यमुनेत डुबकी मारली असती. असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला. तसंच नाव न घेता यमुना नदीच्या प्रदुषणावरुन अरविंद केजरीवाल आणि आपवर टीका केली.