उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत सर्व मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना येत्या १५ दिवसांत त्यांच्या संपत्तीची माहिती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दुसऱ्यांकडून पारदर्शकतेची अपेक्षा करणारे योगी आदित्यनाथ स्वत:ची संपत्तीही जाहीर करणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. १९९८ साली वयाच्या अवघ्या  २६ व्या वर्षी गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, ७२ लाख एवढी एकूण संपत्ती आहे. यामध्ये ३० हजार रुपये रोख रक्कम आहे. दिल्लीत चार, तर गोरखपूरमध्ये दोन बँक खाती आहेत. या बँक खात्यांमध्ये २२ लाख रुपये जमा आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे एक लाख रुपयांची रिवॉल्व्हर आणि ८० रुपयांची एक रायफलही आहे. याशिवाय, त्यांनी १८ हजार रुपयांचा एक स्मार्टफोन खरेदी केला आहे आणि त्यांच्याकडे दोन हजार रुपयांचे घड्याळ आहे. कानात अष्टधातू कुंडल आहेत. त्याचसोबत, सोन्याची चैनीत रुद्राक्षची माळ आहे. दोन्ही मिळून एकूण ४५ हजार रुपयांचे दागिने आहेत.

२००४ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांची संपत्ती केवळ ९.६ लाख इतकी होती. मात्र, दहा वर्षात हा आकडा थेट ७१ लाखांवर जाऊन पोहचला. योगींच्या संपत्तीतील ही वाढ ६३९ टक्के इतकी आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (एडीआर) या संस्थेकडून यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

६० एकरावर पसरलेल्या गोरक्षपीठचे महंत असलेल्या आदित्यनाथ यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही किंवा घरही नाही. त्यांना वारसा हक्कानेही घरातून कोणतीच संपत्ती मिळालेली नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही.