Kamal Hassan कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते कमल हासन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन हे सध्या वादात अडकले आहेत. कन्नड भाषेबाबत कमल हासन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्याची चांगलीच चर्च झाली. त्यामुळे कर्नाटकात त्यांचा आगामी ठग लाईफ या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येते आहे. या सगळ्यानंतर कमल हासन यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र आपल्या वक्तव्यांबाबत माफी न मागणाऱ्या कमल हासन यांना कर्नाटक उच्च न्यायलायने खडे बोल सुनावले आहेत.
न्यायालयात काय घडलं?
कमल हासन यांचा आगामी चित्रपट ‘ठग लाईफ’ वर बंधी घालावी अशी मागणी कर्नाटकात होते आहे. याविरोधात कमल हासन यांनी एक याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती जास्टिस नागप्रसन्ना यांनी म्हटलं आहे की कुठल्याही नागरिकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाच नाही. आपल्या देशाची रचना प्रांतवार झालेली आहे ती भाषेच्या आधारावर झाली आहे. एखादी पब्लिक फिगर असणारी व्यक्ती अशा प्रकारे बोलत असेल तर काय होईल? कुठलीच भाषा दुसऱ्या भाषेपासून जन्माला आलेली नाही. या सगळ्याने फक्त वातावरण बिघडवण्याचं काम केलं आहे. या बदल्यात लोक काय म्हणत आहेत? कमल हासन यांनी माफी मागावी. यात काय चूक आहे? असा सवाल कर्नाटक उच्च न्यायालयाने केला आहे.

कमल हासन यांनी लोकांच्या भावना का दुखावल्या?
पुढे न्यायालयाने असं म्हटलं आहे की जो काही वाद निर्माण झाला त्यासाठी कमल हासन जबाबदार आहेत. आता कमल हासन म्हणतात माफी मागणार नाही. मग त्यांनी कर्नाटकच्या लोकांच्या भावना का दुखावल्या? कमल हासन काही इतिहासकार नाहीत. भाषेचे जाणकार नाहीत. कमल हासन यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला कारण त्यांना त्यांचं आर्थिक हित जपायचं आहे. जे काही घडलं त्यानंतर कमल हासन यांनी माफी मागायला हवी होती. कमल हासन असो किंवा इतर कुणीही असो लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाच नाही.
चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत न्यायालयाने काय म्हटलं आहे?
कमल हासन यांचे वकील ज्ञान चिनप्पा यांनी न्यायलायात युक्तिवाद केला आणि म्हटलं की एकदा न्यायालयाने कमल हासन काय म्हणाले ते ऐकावं. त्यांचा उद्देश कुणालाही अपमानित करण्याचा नव्हता. यानंतर न्यायालयाने सांगितलं की जर कमल हासन माफी मागू शकत नाही तर मग कर्नाटकात त्यांना त्यांचा सिनेमा कशाला चालवायचा आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग कुणीही इतर लोकांच्या भावना दुखावण्यासाठी करु शकत नाही. चित्रपट प्रदर्शित करायला हवा की नाही याबाबत तूर्तास न्यायालयाने काही म्हटलेलं नाही. कमल हासन यांनी माफी मागण्याबाबत फेरविचार केला पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे.