13 August 2020

News Flash

देव कोण? असुर कोण?

‘म्लेच्छ’ ही इतरेपण दर्शविणारी संज्ञा केवळ भाषिक संदर्भामध्ये वापरली गेल्याचेही आपण पाहिले.

प्रतिनिधिक छायाचित्र

ऋषीजनांच्या मनातील इतरेपणाची धारणा ही देव-असुर यांच्या संदर्भाने आणि म्लेच्छ भाषेच्या वापराच्या अनुषंगाने प्रतिबिंबित झाल्याचे दिसते. त्याविषयीच्या व्युत्पत्तीकथेनुसार वेदांच्या रचयित्यांना देवसमाजाविषयी वाटणारा आपलेपणा आणि असुरजनांविषयी असलेली इतरेपणाची भावना ठळकपणे दिसून येते. हाच धागा घेऊन ‘असुर’ या शब्दाच्या/ संकल्पनेच्या मुळाशी जाण्याचा केलेला प्रयत्न..

मानवी समाजाच्या जडणघडणीतील गुंतागुंत ही नेहमीच जटिल आणि बहुपेडी असते हे आपण जाणतोच. इतिहासाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून या जडणघडणीतील ऐतिहासिक स्थित्यंतरांची गुंतावळ सोडवायचा प्रयत्न सुरू केला की त्यातून त्या- त्या वर्तमानातील ‘धारणांचे धागे’ उलगडत जातात. या उलगडण्याच्या प्रक्रियेत आपल्या विद्यमान धारणांच्या बहुस्तरीय गुंतागुंतीची जाणीव होते. क्वचित आपल्या मनात रुजलेल्या समजुतींना धक्का लागतो, तर कधी परंपरांचा मागोवा घेताना एखाद्या संकल्पनेचा आश्चर्यकारक विसंगती दाखवणारा वेगळाच अर्थ सापडतो. एखादा असा अर्थ कधी आपल्याला अप्रिय वाटू शकतो, कधी कुतूहल वाढवणारा ठरतो. साधनांच्या उपलब्धीनुसार व चिकित्सापद्धतीच्या विकसनानुसार त्या अर्थनिष्पत्तीची परिमाणे व मर्यादाही बदलतात. असे काही ‘धारणांचे धागे’ अलगद हाताळताना आपण ‘आपला-परका’ या धारणांविषयीच्या ऐतिहासिक धारणा तपासल्या, वैदिक साहित्यातील संदर्भाच्या आधारे ‘म्लेच्छ’ या शब्दाची व्युत्पत्ती व मूळ अर्थ पाहिला. वैदिक ऋषीसमाजाच्या दृष्टीने अशिष्ट, अशुद्ध, काहीशा अनाकलनीय अशा बोलीद्वारे संभाषण करणाऱ्या समूहाला ‘म्लेच्छ’ हे संबोधन वापरल्याचे आपण पाहिले. त्याविषयीच्या व्युत्पत्तीकथेनुसार ऋषीजनांच्या मनातील इतरेपणाची धारणा ही देव-असुर यांच्या संदर्भाने आणि म्लेच्छ भाषेच्या वापराच्या अनुषंगाने प्रतिबिंबित झाल्याचे दिसते. या कथेनुसार, वेदांच्या रचयित्यांना देवसमाजाविषयी वाटणारा आपलेपणा आणि असुरजनांविषयी असलेली इतरेपणाची भावना ठळकपणे दिसून येते. हाच धागा घेऊन आपण आज ‘असुर’ या शब्दाच्या/ संकल्पनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

‘शतपथब्राह्मणा’तील कथेनुसार देव व असुर हे दोघेही प्रजापतीपासून निर्माण झाले. या दोन समूहांमध्ये असलेला संघर्ष वैदिक साहित्यापासून ठळकपणे दिसत असला तरीही वेदांमधील ‘असुर’ शब्दाच्या उपयोजनाकडे व त्यासंबंधीच्या संदर्भाकडे पाहणे अगत्याचे आहे. पौराणिक काळात ‘असुर’ हा शब्द खलनायकी, नकारात्मक अर्थाने उपयोजिलेला असला तरी वेदांमधील त्या शब्दाच्या अर्थछटा बऱ्याच वेगळ्या आहेत. ऋग्वेदामध्ये ‘असुर’ हा शब्द विविध संदर्भात आढळून येतो. ऋग्वेदीय देवताविश्वातील अनेक देवतांना ऋषींनी ‘असुर’ या विशेषणाने संबोधले आहे. अग्नी, रुद्र, वरुण, सवितृ (सविता), मित्रावरुण, द्यौ (आकाश), अर्यमन, पूषन् इत्यादी देवता ‘असुर’ संकल्पनेशी जोडल्या गेल्याचे दिसून येते. काही ठिकाणी ‘असुर’ हा शब्द विशेषणपर संबोधन म्हणून वापरला गेलेला दिसतो. हे संबोधन विशिष्ट समुदायाचा ‘प्रमुख’/ ‘अधिपती’ या अर्थाने वापरले आहे. उदाहरणार्थ, मित्रा-वरुण या देवताद्वंद्वाला उद्देशून ‘देवानाम् असुर:’ (अर्थ : देवांचा अधिपती/ प्रमुख, ऋग्वेद ७.६५.२) असे विशेषण वापरल्याचे दिसून येते. तर अग्नीला उद्देशून ‘असुरो महो दिव:’ (अर्थ : स्वर्गाचा अधिपती, ऋग्वेद २.१.६) असा उल्लेख मिळतो. मित्र या देवतेच्या सूक्तामध्ये रुद्र या देवतेला अनुलक्षून ‘असुर’ हा शब्द ‘असुरो जनानाम्’ (अर्थ : जनांचा/ माणसांचा अधिपती, ऋग्वेद ७.५६.२४) अशा अर्थी वापरला आहे. काही ठिकाणी देवतांना उद्देशून असुरांचा/ असुरातील वीर (असुरस्य वीरान्, ऋग्वेद २.३०.४) असे विशेषण वापरल्याचे दिसते, तर कुठे असुर (श्रेष्ठ) असा पिता (ऋग्वेद ५.८३.) या अर्थी ‘असुर’ हे संबोधन योजिल्याचे दिसून येते. अन्यत्र ज्या विविध शक्तींना उद्देशून ‘असुर’ हे संबोधन उपयोजिले आहे, त्या शक्तीही ऋग्वेदात देवता मानल्या गेल्याचे दिसून येते. ऋग्वेदाच्या काही पाश्चात्त्य अभ्यासक व अनुवादकांनी ‘असुर’ या शब्दासाठी ‘’lord (आजच्या परिभाषेत श्री- जसे श्रीराम, श्रीकृष्ण) असा शब्द योजिला आहे, तो काही विशिष्ट ऋग्वेदीय संदर्भ पाहता योग्यच वाटतो.

‘निरुक्त’ या प्राचीन व्युत्पत्तिशास्त्रविषयक ग्रंथामध्ये ‘प्राणवान, प्राणशक्तीने युक्त’ अशी ‘असुर’ या शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे. इराणातील प्राचीन पारशी धर्मपरंपरेतील (झरतुष्ट्रीय श्रद्धेनुसार) ‘अहुरमज्द’ या देवतेला ऋग्वेदातील वरुणदेवतेशी जोडले जाते. पर्शियन भाषेतील ‘स’चा ‘ह’ होण्याच्या पद्धतीनुसार ‘असुर’ व ‘अहुर’ या शब्दांचे समांतर अर्थ बहुतांश अभ्यासक लावतात. ‘अवेस्ता’ या पारशी लोकांच्या ग्रंथानुसार ‘देव’ (daevas) ही संकल्पना नकारात्मक अर्थाने वापरलेली दिसून येते. ऋग्वेदामध्ये मात्र ‘असुर’ ही संज्ञा कोणत्याही विशिष्ट देवतासमूहाला अगर अन्य विशिष्ट समुदायाला उद्देशून वापरल्याचे दिसत नाही. तिथे ‘असुर’ ही संज्ञा देवतांप्रमाणेच मानवसमूहांना उद्देशूनही वापरली आहे. ऋग्वेदाप्रमाणे ‘अवेस्ता’मध्येही क्वचित ठिकाणी ‘असुर’ ही संज्ञा मानवगणांना उद्देशून वापरल्याचे दिसते. थोडक्यात ‘असुर’ ही संज्ञा विविधार्थी अंगांनी उपयोगात होती असे दिसते.

ऋग्वेदामध्ये एखाद् ठिकाणी हे विशेषण ऋषिसमूहाच्या दृष्टीने शत्रू असलेल्या ‘अदेव’ समूहांना उद्देशूनही वापरले गेले आहे (असुरा अदेवा:, ऋग्वेद ८.९६.९). ‘असुर’ शब्दाच्या पौराणिक खलनायकी अर्थाचे मूळ इथे असू शकते. मात्र, वेदांमध्ये ज्यांना ‘असुर’ या विशेषणाने संबोधण्यात आले आहे, त्यांपैकी कुणालाही पुराणांत खलनायकी अर्थाने ‘असुर’ ही संज्ञा वापरली गेल्याचे दिसत नाही. अथर्ववेदात ‘असुर’ हा शब्द अनेकवचनार्थाने येतो. यातील ‘असुर’ शब्दाचा एकवचनी उल्लेख हा ‘सकारात्मक’ शक्तींना उद्देशून वापरला आहे, तर बहुतांश अनेकवचनी संदर्भ हे खलनायकी, नकारात्मक अर्थाने वापरले आहेत. अथर्ववेद व कर्मकांडप्रधान ब्राह्मणग्रंथामध्ये ‘असुर’ हे ‘देवांचे शत्रू’ या रूपातच अधिक प्रमाणात दिसतात. ऋग्वेदामध्ये इंद्राला विरोध करणाऱ्या/ इंद्राद्वारे विरोध झालेल्या समूहाचे संदर्भ नेहमीच येतात. अथर्ववेदामध्ये अशा इंद्रविरोधी समूहांना ‘असुर’ म्हणून संबोधित केल्याचे दिसून येते. हे ऋग्वेदीय व अथर्ववेदीय संदर्भ जोडून ‘आर्य-आक्रमण सिद्धांत’ मानणाऱ्या काही पाश्चात्त्य संशोधकांनी ‘असुर’ हे येथील स्थानिक ‘अनार्य’ समूह असावेत असा निष्कर्ष काढला आहे.

या पृष्ठभूमीवर आपल्याला वेदांमधील ऋषिसमाजाला शत्रू/ इतरे वाटणाऱ्या काही समूहांचे इतर संदर्भ पाहावे लागतात. त्यादृष्टीने ‘रक्षस्’ व ‘दस्यू’ या वैदिकेतर समूहांना उद्देशून वापरलेल्या संबोधनांकडे आपण पाहू या. यापैकी ‘रक्षस्’ हा शब्द पौराणिक परिभाषेमध्ये ज्यांना राक्षस म्हटले जाते अशा अतिमानवी शक्ती असलेल्या (यातुधान) गणांना उद्देशून वापरला आहे. मात्र या ठिकाणी हे ‘रक्षस्’ गण (इंद्रापेक्षा) प्रामुख्याने अग्नी व सोम या देवतांचे शत्रू असल्याचे उल्लेख अधिक दिसतात. ‘दस्यू’ हा शब्द स्पष्टपणे वेद-रचयित्या ऋषिसमूहाच्या दृष्टीने परक्या असलेल्या मानवी शत्रूंना उद्देशून वापरल्याचे दिसते. त्यामुळे ऋग्वेदानुसार ‘असुर’ हा शब्द बहुतांशी वेगळ्या अर्थाने वापरला गेला असला तरी अथर्ववेदात इंद्राचे शत्रू म्हणून गणल्या जाणाऱ्या समूहाला उद्देशूनच ‘असुर’ शब्द वापरल्याचे दिसते. बऱ्याच ठिकाणी ‘असुर’ व ‘दस्यू’ हे शब्द समानार्थाने वापरले गेले नसले तरी त्या शब्दांच्या काही सूक्तांतील वापरावरून या दोन शब्दांच्या अर्थात काहीसे साधर्म्य असल्याचे दिसून येते. कृष्ण यजुर्वेदाच्या प्राचीन ब्राह्मणांनुसार ‘असुर’ हा देवताविरोधी समूह असला तरीही ‘रक्षस्’ या गणापासून पूर्णत: वेगळा असल्याचे स्पष्ट दिसून येते. मात्र ‘शतपथब्राह्मणा’तील कथेत आपण पूर्वी पाहिलेले संदर्भ पाहता ‘असुर’ व ‘रक्षस्’ या संज्ञा एकमेकांशी निकटता दाखवतात.

‘अवेस्ता’मधील ‘अहुर’ ही कल्पना बहुतांशी ‘अहुरमज्द’ या देवतेला उद्देशून वापरली गेली असली तरी जिथे ‘अहुर’ असा शब्द स्वतंत्रपणे (‘अहुरमज्द’व्यतिरिक्त) आला आहे तिथे तो ऋग्वेदातील आधिपत्यनिदर्शक अर्थाशी तंतोतंत जुळतो. त्यामुळे वेदपूर्वकालीन इंडो-इराणीय भाषक समूहामध्ये असुर-अहुर संज्ञा स्वामित्वनिदर्शक अर्थानेच वापरली जात होती असं दिसतं. असिरीयन श्रद्धाविश्वात तर ‘अशुर’ ही एक महत्त्वाची शक्ती देव मानली गेल्याचे दिसते. बौद्ध साहित्यातही ‘असुर’ ही संज्ञा अतिमानवीय शक्ती असलेल्या देवताविरोधी, देवतासदृश शक्तींसाठी वापरली गेल्याचे दिसते.

‘म्लेच्छ’ ही इतरेपण दर्शविणारी संज्ञा केवळ भाषिक संदर्भामध्ये वापरली गेल्याचेही आपण पाहिले. ‘दस्यूं’चे ऋग्वेदातील त्यांच्या शारीरिक ठेवणीचे वर्णन करणारे संदर्भ इतरेपणाचे निदर्शक असल्याचे दिसते. मात्र असुरांविषयी असे ठळक संदर्भ दिसत नाहीत. वैदिक साहित्यामध्ये ‘असुर’ या शब्दाचा ऋग्वेदीय देवांना उद्देशून असलेला वापर ते अथर्ववेद व ब्राह्मणग्रंथापासून काहीशा नकारात्मक अर्थाने केले जाणारे या शब्दाचे उपयोजन हे तत्कालीन सामूहिक-सांस्कृतिक स्मृती व धारणांच्या परिवर्तनाचे द्योतक आहे.  पुसट, अस्पष्ट व काहीदा परस्परविसंगत अशा या स्मृतींतून पुराणकाळापर्यंतच्या प्रवासात ‘असुर’ या शब्दाला नकारात्मक संदर्भ मिळून तो पूर्णत: नकारात्मक व दुष्टत्वाचे प्रतीक बनला.

आर्य-आक्रमण सिद्धांताला आज अकादमिक विश्वात तितकेसे प्रमाण मानले जात नसले तरीही भारतातील सामाजिक संघर्षांमध्ये, राजकीय आयडेंटिटीच्या राजकारणात मात्र हा सिद्धांत अजूनही मूळ रोवून उभा आहे. नृशंस जाती-व्यवस्थेविरोधातील वासाहतिक काळातील लढय़ात इतर कोणत्याही सांस्कृतिक-सामाजिक वर्तुळात रुजतात तशी वस्तुनिष्ठतेच्या पल्याड असलेली काही मिथके व कृतक धारणा बनल्या/बनवल्या गेल्या. काही धारणा- ज्या पूर्वीपासूनच त्या, त्या विशिष्ट जमातींत अस्तित्वात होत्या, त्यांना या सामाजिक-राजकीय सत्तासंघर्षांत अधिक टोकदारपणा प्राप्त झाला. ‘असुर’ या शब्दाचा भाषिक-सामाजिक अंगाने झालेला प्रवास व इतिहास पाहताना बिहार प्रांतातील ‘असुर’ या जमातीवरून दीड-दोन वर्षांपूर्वी झालेल्या व संसदेत गाजलेल्या वादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. बिहारमधील हा असुर समाज आपले महिषासुर या पुराणप्रसिद्ध असुराशी जैव-नाते असल्याचा दावा करतो. शिष्ट-भद्र म्हणवून घेणाऱ्या समाजाच्या धारणांमध्ये महिषासुराचे खलनायकत्व रुजले असल्याने व महिषासुर हा महिषासुरमर्दिनी या श्रद्धाविश्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या देवीचा शत्रू व दुष्टत्वाचे प्रतीक मानला गेल्याने त्या दोन समूहांतील राजकीय-सांस्कृतिक संघर्ष चव्हाटय़ावर आला. या सांस्कृतिक संघर्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, वंचित-शोषित वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या संघटना व समूहांनी आणि दुसऱ्या बाजूच्या सश्रद्ध, धर्मव्यवस्था मानणाऱ्या समूहांनी हा संघर्ष विकोपाला नेऊन त्याला राष्ट्रीय पातळीवर कळीचा मुद्दा बनवले. त्या पृष्ठभूमीवर असुर, देव या प्राचीन, पुराणकालीन प्रतीकांविषयीचे बदलत जाणारे संदर्भ व मूळ ग्रंथांच्या आधारे आपण पाहिलेली ही गुंतागुंत तपासली असता त्या संघर्षांची व त्या, त्या समूहाची राजकीय मांडणी व कर्कश्शता अनेकदा संदर्भहीन व अप्रस्तुत वाटते. त्यामुळेच दोन्ही बाजूंचे समूह केवळ राजकीय स्वार्थासाठी अशा अस्मितेच्या राजकारणाचे शस्त्र परजत असावेत अशी रास्त शंका उपस्थित होते.

आधुनिक काळात जॅक्स देरीदा या फ्रेंच भाषाशास्त्री तत्त्वज्ञ-अभ्यासकाने मांडलेल्या ‘विखंडनवाद’ (Deconstruction) या सिद्धांतानुसार भाषेची मांडणी व शब्दार्थ यांचे अर्थ तपासताना विशिष्ट ग्रंथाचे वा कोणत्याही लिखित साहित्याचे आकलन करून घेताना विशिष्ट शब्द, संकल्पना, परिभाषा यांच्यामागील पारंपरिक गुंतागुंत आणि अर्थामध्ये होणाऱ्या बदलांचा मागोवा घेत मूळ संकल्पनेच्या जवळपास पोहोचता येतं. त्या अर्थछटांमध्ये झालेल्या बदलांची कारणे तपासताना संबंधित काळांमधील व अर्थातरणाच्या प्रक्रियेमागील समाजकारण-राजकारणाचे ऐतिहासिक संदर्भही लक्षात येतात. या अर्थछटांमधील परिवर्तने, नव्याने निर्माण होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या सामूहिक-राजकीय स्मृती व मिथकांचाही मागोवा अभ्यासकाला घ्यावा लागतो. त्यासाठी सारे उपलब्ध ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक संबंध तपासावे लागतात. त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून झालेल्या अभ्यासातून वर्तमानातील काही सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय ओळखी (identities) व त्यामुळे निर्माण होणारी राजकीय-सामाजिक गुंतागुंत लक्षात येण्यास मदत होते. हे बदलते संदर्भ व त्यांची प्रस्तुतता आजच्या उत्तराधुनिक काळाला ओलांडून नव्या युगात प्रवेश करणाऱ्या जगात कशा पद्धतीने हाताळायला हवी याचा विचार असे ‘धारणांचे धागे’ उलगडताना आपसूक होऊ  शकतो. बदलत्या जगात जाती-धर्म-राष्ट्रीयता, प्रांतवाद, भाषावादाचे प्रश्न अक्राळविक्राळपणे आ वासून उभे असताना सांस्कृतिक सहअस्तित्व आणि धारणांविषयीची सहिष्णुता बाळगायला साहाय्यभूत होतील अशा अनेक धाग्यांची उकल आपल्याला पुढील भागांत करायची आहे.

हेमंत प्रकाश राजोपाध्ये rajopadhyehemant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2018 1:01 am

Web Title: hemant prakash rajopadhye article on demon word concept
Next Stories
1 अयं निज: परो वेति..
2 वर्षं तद्भारतं नाम…
3 परंपरांच्या पल्याड..
Just Now!
X