चीनमध्ये जन्माला आलेल्या करोना विषाणूने आतापर्यंत ९० पेक्षा अधिक देशांमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान करोनाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांमार्फत दिला जात आहे. मात्र सॅनिटायजर पेक्षा साबणाने हात धुतल्यास जास्त स्वच्छ होतात असा दावा इंग्लडमधील ‘युनिव्हसिटी ऑफ साऊथ वेल्स’मधील संशोधकांनी केला आहे.

करोना विषाणूवर सॅनिटाजरच्या तुलनेत साबण जास्त चांगल्या प्रकारे मात करु शकतो. साबणात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या रसायनांमुळे हा विषाणू नष्ट होतो. या रसायनांना अॅम्फिफाईल्स असं म्हणतात. हे घटक कुठल्याही प्रकारच्या व्हायरसला निष्क्रिय करू शकतात. असा दावा ‘युनिव्हसिटी ऑफ साऊथ वेल्स’मधील प्राध्यापक पॉल थॉर्डसन यांनी केला आहे.

यापूर्वी असेच काहीसे संशोधन ‘जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटी’च्या संशोधकांनी केले होते. जेल, द्रव्य किंवा क्रिमच्या स्वरूपात असलेल्या सॅनिटायजरपेक्षा कुठल्याही प्रकारच्या साबणात रोगजंतूंचा नायनाट करण्याची क्षमता अधिक असते असा दावा त्यांनी केला होता.