“हम एक बार जीते है, एक बार मरते है, शादी एक बार होती है और प्यार भी एक बार होता है” या शाहरुख खानच्या आयकॉनिक डायलॉगपासून रणबीर कपूरच्या “प्यार होता कई बार है” या गाण्यापर्यंत आपण प्रेमाच्या व्याख्या सर्रास बदलताना पाहिल्या आहेत. यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व डेटिंग साइट्सचा सुद्धा तितकाच सहभाग आहे. ज्या काळात इंटरनेट ही चैनीची गोष्ट होती त्या काळात आधी इ-मेल, ऑर्कूट, मेसेंजर आणि मग फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोक एकमेकांशी मैत्री करायचे, डेटिंग करायचे न प्रेमात पडायचे.

यानंतर आलेल्या इंस्टाग्राम व इतर काही डेटिंग एप्सनी तर आता याहीपलीकडे जाऊन झेंडे रोवले आहेत. सध्याच्या ‘जेन झी’ मुळे आपल्याला ‘टिंडर’, ‘बंबल’ किंवा ‘आयल’सारख्या डेटिंग प्लॅटफॉर्मची नाव तर सर्रास कानावर पडतात, पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का की आज जगभरात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या साईटची सुरुवात ही ‘डेटिंग वेबसाइट’मधूनच झाली होती. आज ज्या प्लॅटफॉर्मवर जगभरातील ऑडिओ तसेच व्हिडीओ क्लिप्सपासून आजच्या काळातील शॉर्ट व्हिडीओज पर्यंत सगळं काही उपलब्ध आहे अन् आज ज्या प्लॅटफॉर्मशिवाय आपल्या हातातील स्मार्टफोनला तसेच इंटरनेटलाही काही अर्थ नाही अशा व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म ‘यूट्यूब’विषयी आपण चर्चा करत आहोत. कित्येकांना ही वाचून आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल की यूट्यूब ही वेबसाइट प्रथम डेटिंग करता सुरू करण्यात आली होती.

आणखी वाचा : National Post Day : टपाल पेटीचा रंग लाल का असतो ? जाणून घ्या…

यूट्यूबचे को-फाऊंडर स्टीव्ह चेन यांनी सांगितल्याप्रमाणे यूट्यूबची सुरुवात ही डेटिंग वेबसाइट म्हणूनच झाली होती. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्लॉग्स आणि व्हिडीओजच्या माध्यमातून आपण आपल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा मांडण्यासाठी या वेबसाईटची सुरुवात करण्यात आली होती. वेबसाइट लाईव्ह झाल्यावर पहिले ५ दिवस यावर कोणीही व्हिडीओ अपलोड केला नव्हता. कदाचित या फॉरमॅटमध्ये डेटिंग वेबसाइट ही जास्त लोकांना आकर्षित करत नसल्याने स्टीव्ह चेन व त्यांच्या टीमने ही वेबसाइट सर्व प्रकारच्या व्हिडीओजसाठी खुली केली अन् मग तिथून ‘यूट्यूब’ या ऑनलाइन स्ट्रीमिंग आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली.

एप्रिल २००५ मध्ये पहिला व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला ज्याचं नाव आहे ‘Karim’s Me At The Zoo’, आणि हो हा व्हिडीओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे. २००५ साली डेटिंगसाठी सुरू झालेल्या या साईटवर एका वर्षभरातच २५० लाख व्यूज आणि दिवसाला २०००० हून अधिक व्हिडीओ अपलोड होऊ लागले. ऑक्टोबर २००५ मध्ये ‘नाइके’ ची एक जाहिरात प्रचंड गाजली व हा यूट्यूबवरील पहिला व्हायरल व्हिडीओ ठरला ज्याला १० लाख व्यूज मिळाले. एकूणच वाढती लोकप्रियता, जाहिराती अन् त्यातून मिळणारा बक्कळ पैसा पाहता नंतर गुगलने यूट्यूब ही कंपनी १.६५ अब्ज डॉलर्सना विकत घेतली अन् पुढे या वेबसाइटने नव्या युगात एक वेगळीच क्रांती घडवली.

आणखी वाचा : तुम्हाला लहान छिद्रांचे हे फोटो बघून किळस किंवा भीती वाटते का? यामागील कारण जाणून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज महिन्याला जवळपास २० लाख लोक हे या यूट्यूबला भेट देतात. जगातील दुसऱ्या क्रमांकावरचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून यूट्यूबकडे पाहिलं जातं. आज मनोरंजन, शिक्षण, विज्ञान, इतिहास, भूगोल, पाककला, आरोग्य, अन् अशा असंख्य विषयांशी निगडीत सगळी माहिती साऱ्या जगभरातील लोकांसाठी व्हिडीओच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारं यूट्यूब हे आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचं मार्गदर्शनही या माध्यमातून मिळतं. आजच्या पिढीच्या मुलांच्या आयुष्याचा ‘यूट्यूब’ हा एक अविभाज्य भाग बनला आहे. या यूट्यूबने कित्येक लोकांना लाखों करोडो कामवायला शिकवलं. कॅरीमिनाटी. भुवन बाम, झाकीर खानसारख्या कलाकारांपासून संदीप महेश्वरीसारख्या कित्येकांना यूट्यूबने स्टार बनवलं, जगभरात पोहोचवलं. केवळ डेटिंगसाठी सुरू केलेल्या एका छोट्या साईटचा जागतिक क्रांतीत, लोकांच्या सर्वांगीण विकासात, अन् अर्थकारणात सिंहाचा वाटा असेल असा विचार ही साईट बनवणाऱ्या लोकांच्या मनाला शिवलादेखील नसेल.