समजून घ्या : काही किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या ‘स्पायडर वेब’मागील रहस्य आहे तरी काय?

नुकताच या परिसरामध्ये मोठा पूर येऊ गेला आणि त्यानंतर हे जाळं दिसू लागलं ज्याचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत, पण हे जाळं का निर्माण करण्यात आलंय?

Explained Massive Spider Webs In Australia
Massive Spider Webs In Australia काही ठिकाणी जाळ्याची लांबी एक किमीहून अधिक आहे. (मूळ फोटो : रॉयटर्सवरुन साभार)

सध्या इंटरनेटवर ऑस्ट्रेलियामधील काही फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये नजर जाईल तिथपर्यंत कोळ्यांचं जाळ पसरल्याचं दिसत असून वाऱ्यासोबत ही जाळीची चादर एखाद्या लाटेप्रमाणे वाटतेय. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत खरे पण कोळ्यांनी हे एवढं लांब जाळं का विणलं आहे त्यामागील कारणं काय आहेत?, कोळी अशी जाळी का विणतात?, त्याने त्यांचा काय फायदा होतो असे अनेक प्रश्न हे फोटो पाहणाऱ्यांना पडतात. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न….

कुठे आणि काय घडलंय नेमकं?

ऑस्ट्रेलियाच्या अग्नेय दिशेला असणाऱ्या व्हिक्टोरिया राज्यामध्ये नुकताच मोठा पूर येऊन गेला. अतीवृष्टीमुळे येथील नद्यांना पूर आलेला. मात्र त्यानंतर येथे निसर्गाचा एक भन्नाट अविष्कार पहायाला मिळाला आहे. या राज्यामध्ये एका भागात लाखो कोळ्यांनी (स्पायडर्स) अनेक किलोमीटरच्या परिसरामध्ये एक अती विशाल जाळं विणलं आहे. येथील झांडांवर, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दिशादर्शकांवर इतकचं काय तर गवताळ प्रदेशावर दूर दूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे. कोळ्यांनी विणलेल्या या जाळ्यांचे फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

किती दूरपर्यंत पसरलं आहे हे जाळं?

सेल्स आणि लँगफोर्ड या दोन शहरांमधील भागात ही जाळी दिसून येत आहेत. ही दोन्ही शहरं एकमेकांपासून आठ किलोमीटर अंतरावर आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार गिप्सलॅण्ड भागामध्ये रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जंगली भागामध्ये जाळं एक किलोमीटरहून अधिक लांबीचं आहे. हा आठवड्याच्या शेवटापर्यंत कोळ्यांनी विणलेली ही जाळी नष्ट होतील, असं सांगितलं जातं आहे. सामान्यपणे दरवर्षी व्हिक्टोरियामध्ये हिवाळ्याच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला तोंड द्यावं लागतं. दरवर्षी येथे पावसाळ्यामध्ये स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कोळी अशाप्रकारचे जाळी निर्माण करुन अधिक अधिक उंच ठिकाणी स्थलांतर करतात.

कोळी अशी जाळी का निर्माण करतात?

गिप्सलॅण्ड भागामध्ये मागील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथे भूपृष्ठाजवळ राहणाऱ्या कोळ्यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी भराभर जमीनीपासून अधिक उंच ठिकाणी जाण्याची धडपड केली आणि त्यामधून या जाळ्यांची निर्मिती झालीय. कोळी अशापद्धतीने आपत्कालीन स्थितीमध्ये भराभर जाळं विणून एकाच वेळी हलचाल करत उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीला बलुनिंग असं म्हणतात. यामध्ये कोळी त्यांच्या शरीरामधून जाळं निर्माण करण्यासाठी वापरलं जाणारं द्रव्य अगदी वेगाने बाहेर फेकत त्याच्या आधारे जास्तीत जास्त उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. लाखो कोळ्यांनी एकाच वेळेस अशापद्धतीने स्थलांतर केल्याने या ठिकाणी लांबच लांब पर्यंत जाळ्याची चादर तयार झाल्याचं चित्र दिसत आहे.

कारण काय ठरलं?

मागील आठवड्यामध्ये व्हिक्टोरिया राज्यामध्ये जोरदार वाऱ्यांसहीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठ्याप्रमाणात या ठिकाणी पुराचं पाणी रहिवाशी भागात शिरलं आणि संपत्तीचं मोठं नुकसान झालं. या ठिकाणी अगदी वेगाने पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने पृष्ठभागालगत असणाऱ्या गवतामध्ये, झाडांवर राहणाऱ्या कोळ्यांनी भारभर जाळी विणण्यास सुरुवात केली. अर्थात जाळी विणणं हा त्याचा उद्देश नव्हता तर पाण्याचा वाढता स्तर पाहता लवकरात लवकर अधिक अधिक उंच ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एकाच वेळी लाखो कोळ्यांनी अशाद्धतीने स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामधून या ठिकाणी लांबच लांब जाळीची चादर (ज्याला गोसमेअर असं म्हणतात) निर्माण झाली.

जाळ्यांचं वैशिष्ट्य काय?

संकट काळात कोळ्यांनी विणलेली ही जाळी फार मजबूत नसतात. या जाळ्यांच्या आधारे या कोळ्यांना कमी वेळात जास्तीत जास्त लांब सुरक्षित ठिकाणी जातं यावं या उद्देशाने ती विणली जातात. अनेकदा हे कोळी वाऱ्याच्या दिशेने प्रवास करत सुरक्षित जागी पोहचण्यासाठी या जाळ्यांवरुन मार्गक्रमण करतात. कधी कधी येथे वाऱ्याचा वेग ताशी १०० किमीपर्यंतही असतो.

एकावेळी एकच जाळं निर्माण करतात…

हे जाळं बनवताना कोळ्यांच्या शरीरामधून निघणारा पदार्थ एवढा नजूक असतो की तो वाऱ्यासोबत वाहून जातो. त्यामुळेच एका जागी निर्माण झालेलं जाळं हे अनेकदा झाड्यांच्या शेंड्यापासून, उंच गवत, रस्त्याच्या बाजूचे फलक आणि इतर ठिकाणी पसरतात. जमीनीवर पुराचं पाणी साठू लागल्यानंतर या वस्तूंवर चढण्यासाठी कोळ्यांना या जाळ्याची मदत होते. अशाप्रकारची जाळी निर्माण करणाऱ्या कोळ्यांच्या प्रजातीला व्हॅगरंट हंटर्स असं नाव असल्याचं द गार्डीयनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. हे कोळी प्रामुख्याने जमीनीवर राहतात. मात्र जमीनीवर राहताना ते जाळी विणत नाहीत. तसेच पुराच्या वेळेसही हे कोळी एका वेळी सलग एक जाळं निर्माण करतात. म्हणजेच सध्या दिसणाऱ्या या महाकाय जाळ्यांमधील प्रत्येक सलग भाग हा एका कोळ्याने तयार केलाय. म्हणजेच लाखो कोळ्यांनी मिळून ही जाळ्याची चादर विणलीय असं म्हणता येईल.

ऑस्ट्रेलियामधील कोळी घातक…

अनेकदा इंटरनेटवर हा मोठ्या आकाराच्या जाळ्यांचे फोटो व्हायरल होत असतात. कोळ्यांच्या काही प्रजाती विषारी असल्या तरी ही जाळी बनवणारे कोळी माणसासाठी घातक नसतात. २००० ते २०१३ दरम्यान ऑस्ट्रेलियात जवळजवळ १२ हजार ६०० जणांना कोळी चावल्याने रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोळ्यांची दहशत इतकी आहे की ब्रिटनमधील लोकप्रिय पीपा पिग या कार्टूनमधील एका भागात कोळी हे खूप खूप लहान असतात ते तुम्हाला त्रास देऊ शकतं नाही असं वाक्य होतं. हा भाग ऑस्ट्रेलियात प्रसारित करण्यात आला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व समजून घ्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Explained why massive spider webs have blanketed a region in australia scsg

Next Story
समजून घ्या सहजपणे : भारतीय महिलांच्या पराभवाची पाच कारणे
ताज्या बातम्या