New Tatkal Ticket Booking Rules : भारतीय रेल्वे प्रशासनाने तत्काळ रेल्वे तिकिटे बुकिंगसंदर्भात १ जुलैपासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, तुम्हाला ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी तुमचा आधार नंबर आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवर लिंक करणे गरजेचे असणार आहे. असे न केल्यास तुम्ही रेल्वे तिकीट बुकिंग करू शकणार नाही.
तसेच १५ जुलैपासून तत्काळ तिकिटे ऑनलाइन बुक करताना तुम्हाला आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर येणारा ओटीपी द्यावा लागेल. या नव्या नियमाच्या माध्यमातून रेल्वेला सामान्य प्रवाशांच्या हाती तत्काळ तिकिटे पोहोचू न देणाऱ्या तिकीट दलालांना लगाम घालयचा आहे. जर तुम्हीही स्वतः ट्रेन तिकिटे बुक करत असाल आणि तुमचे आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपवर अकाउंट असेल तर तुमचा आधार लिंक करा. हे काम ऑनलाइन करता येते, पण ते कशा पद्धतीने करायचे जाणून घ्या.
आधार कार्ड लिंक केल्यास मिळतील ‘हे’ फायदे

आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जो युजर आयआरसीटीसी अकाउंट आधार लिंक करून तिकीट बुक करेल, तो एका महिन्यात २४ तिकिटे बुक करू शकतो. पण, आधार लिंक केले नसल्यास एका महिन्यात फक्त १२ तिकिटे बुक करता येतील. आधार लिंकचा फायदा असा आहे की, तुम्हाला दरमहिन्याला जास्त तिकिटे बुक करता येतात. बरेच लोक त्यांच्या कुटुंबासह ट्रिपचा प्लॅन करतात. अशावेळी एकाच अकाउंटमधून तिकीट बुकिंग करताना आधार कार्ड लिंक करणे फायदेशीर आहे. १ जुलैपासून हा नियम लागू होत आहे, म्हणून जर तुम्ही आयआरसीटीसी युजर आयडीशी आधार लिंक केलं नसेल तर खालील सोपी प्रोसेस फॉलो करा.

IRCTC युजर आयडी आधारशी कसा लिंक करायचा?

आयआरसीटीसी युजर आयडी आधारशी लिंक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

१) तुमच्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरील वेब ब्राउझरमध्ये http://www.irctc.co.in ओपन करा.
२) आयआरसीटीसी अकाउंटमध्ये लॉग इन करा.
३) MY ACCOUNT टॅबवर जा आणि Authenticate User ऑप्शन निवडा.
४) तुमचे प्रोफाइल डिटेल्स ऑथेंटिकेट युजर पेजवर दिसतील.
५) तिथे तुमचा आधार नंबर एंटर करा, तुम्ही आधार व्हर्च्युअल आयडीदेखील एंटर करू शकता. डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपीवर क्लिक करा.
६) आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, तो एंटर करा.
७) चेक बॉक्स वाचा, त्यावर टिक करा आणि सबमिट बटण दाबा.
८) जर ऑथेंटिकेशन सक्सेस झाले, तर स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. जर ऑथेंटिकेशन अनसक्सेस झाले, तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा लागेल.

IRCTC युजर आयडी आधारशी लिंक करण्यात काय अडचण येऊ शकते?

या प्रोसेसदरम्यान, काही युजर्सना त्यांचे नाव आयआरसीटीसी डेटा आणि आधार कार्ड डेटाशी मॅच दिसणार नाही. जेव्हा एखादा युजर आयआरसीटीसी वॉलेटशी कनेक्ट करू इच्छितो तेव्हादेखील ही अडचण येऊ शकते. यामुळे तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी तपशील आयआरसीटीसी अकाउंट आणि आधार कार्डवर सारखेच असले पाहिजेत. जर असे नसेल, तर प्रथम आयआरसीटीसी अकाउंटमधील तुमच्या डिटेल्समध्ये बदल करा. जर तुम्ही डिटेल्समध्ये बदल करू शकत नसाल, तर तुम्ही एक नवीन आयआरसीटीसी युजर आयडी तयार करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधार कार्ड नसेल तर?

आजकाल प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे, परंतु जर कोणाकडे आधार कार्ड नसेल किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे ते अपडेट करावे लागले, तर अशा परिस्थितीत आयआरसीटीसी युजर आयडीशी आधार लिंक केल्याशिवाय, तुम्ही तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाही.