भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. स्वातंत्र्यापूर्वी वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागलेला हा देश आज एक आहे; ज्यामध्ये अनेक राज्ये आहेत. पण तुमच्या एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का की, भारतात वेगवेगळी राज्ये असूनही त्यांच्या नावांमध्ये एक साम्य आहे. अनेक शहरांच्या नावाच्या शेवटी पूर आणि बाद असे असते. जसे की, जयपूर, जोधपूर, जबलपूर, कानपूर, रायपूर किंवा अहमदाबाद, गाझियाबाद, औरंगाबाद, उस्मानाबाद, फिरोजाबाद इ. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, शहरांच्या नावांच्या शेवटी पूर किंवा बाद का लावले जाते. त्यामागे त्या शहर किंवा ठिकाणांबद्दल खूप खास माहिती आहे; जी पूर्वीच्या लोकांनी या ठिकाणांची नावे ठेवताना विचारात घेतली होती, याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेऊ या…
शहरांच्या नावांच्या शेवटी ‘पूर’ का लिहिले जाते?
शहरांच्या नावांपुढे पूर लावण्याची परंपरा फार जुनी आहे. कोणत्याही ठिकाणाला नाव देण्याआधी त्या ठिकाणाशी संबंधित एक खास ओळख जोडली जाते. पूर हा एक प्राचीन संस्कृत शब्द आहे; ज्याचा उल्लेख ऋग्वेदातही आहे. याचा अर्थ शहर किंवा किल्ला, असा होतो.
अशा स्थितीत जुन्या काळी राजा जेव्हा एखादे शहर किंवा किल्ला वसवत असे, तेव्हा त्याच्या नावापुढे पूर लावले जायचे. उदाहरणार्थ- राजस्थानच्या जयपूरची स्थापना राजा जयसिंह यांनी केली होती. म्हणून त्याचे नाव त्यांच्या नावावरून जयपूर, असे ठेवण्यात आले. महाराणा उदयसिंह यांच्या नावावरून उदयपूर या गावाचे नाव ठेवण्यात आले.
तर सोळा गावांपासून तयार झालेले म्हणून त्याचे नाव सोलापूर, असे ठेवले आहे. तर कोल्हासुराचा महालक्ष्मीने वध केला आणि त्याला दिलेल्या वरानुसार कोल्हापूर असे नाव ठेवण्यात आले. अशी अनेक गावे आहेत की, त्यांच्या मागे एक इतिहास आहे.
तसेच काही लोकांचा असा विश्वास आहे की, पूर हा शब्द अरबी भाषेतही आढळतो; ज्यामुळे अफगाणिस्तान व इराणसारख्या देशांतील काही शहरांच्या नावांच्या शेवटीही पूर शब्द आढळतो.
बाद शब्दाचा अर्थ काय?
भारतातील अनेक शहरांच्या नावांच्या शेवटी तुम्हाला बाद, असे लिहिल्याचे दिसते. अगदी पाकिस्तानात इस्लामाबाद आणि बांग्लादेशात जलालाबाद आहे. तर, भारतात औरंगाबाद, गाझियाबाद, उस्मानाबाद अशी अनेक शहरे आहेत. पण, या बाद या शब्दाचा नेमका अर्थ काय? वास्तविक हा एक फारसी शब्द आहे; ज्यात बाद म्हणजे पाणी. अशा स्थितीत या संपूर्ण बाद शब्दाचा अर्थ म्हणजे अशी जागा जेथे पाणी असेल आणि तेथे पिके वाढू शकतील.