राज्यातील सात मतदार संघात आज (गुरुवारी) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर मतदानासाठी ओळखपत्र म्हणून ११ कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. यात पासपोर्ट, वाहन चालक परवाना, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक यांचा समावेश आहे.

राज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये गुरुवारी मतदान होणार आहे.  पहिल्या टप्प्यात एकूण ११६ उमेदवार असून १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत. तर १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात सर्वाधिक ३० उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी ५ उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.

मतदानाची वेळ

गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी आहे. तर उर्वरित ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल.

मतदानासाठी ओळखपत्र ही कागदपत्रे ग्राह्य धरली जातील

१. पासपोर्ट
२. आधारकार्ड
३. वाहन चालक परवाना
४. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
५. छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक
६. पॅनकार्ड
७. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
८. मनरेगा कार्यपत्रिका
९. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
१०. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
११. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

पहिल्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ :
१. वर्धा – १७ लाख ४१ हजार मतदार – २०२६ मतदान केंद्र
२. रामटेक – १९ लाख २१ हजार मतदार – २३६४ मतदान केंद्र
३. नागपूर – २१ लाख ६० हजार मतदार – २०६५ मतदान केंद्र
४. भंडारा-गोंदिया – १८ लाख ८ हजार मतदार – २१८४ मतदान केंद्र
५. गडचिरोली-चिमूर – १५ लाख ८० हजार मतदार – १८८१ मतदान केंद्र
६. चंद्रपूर – १९ लाख ८ हजार मतदार – २१९३ मतदान केंद्र
७. यवतमाळ-वाशिम – १९ लाख १४ हजार मतदार – २२०६ मतदान केंद्र