04 July 2020

News Flash

Lok Sabha 2019 : नांदेडात धक्कादायक निकाल की अशोक चव्हाणांची बाजी?

नादेडकरांनी दर १५ वर्षाला येथे धक्कादायक निकाल दिल्याचा इतिहास आहे. इतिहासात डोकावल्यास नांदेडच्या जनतेने अशोक चव्हाण यांनाही पराभवाची चव चाखायला लावली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण

अस्तित्वात आल्यापासून नांदेड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. मात्र, नादेडकरांनी दर १५ वर्षाला येथे धक्कादायक निकाल दिल्याचा इतिहास आहे. इतिहासात डोकावल्यास नांदेडच्या जनतेने अशोक चव्हाण यांनाही पराभवाची चव चाखायला लावल्याचे दिसते. गेल्या पंधरा वर्षांपासून नांदेड मतदारसंघात काँग्रेसचा खासदार राहिला आहे. मात्र, यंदा नांदेडच्या परंपरेनुसार निकाल लागतो की, ही परंपरा खंडीत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

१९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत व्ही. बाबाराव यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विजयी पतका फडकावली होती. १९५२ पासून १९७१ पर्यंत तब्बल पाच वेळा नांदेडकरांनी काँग्रेसला निवडून दिले. मात्र, १९७७ च्या सहव्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. काँग्रेसच्या एम. गोविंदर यांना पराभवाचा झटका बसला. पीडब्ल्यूपीच्या केशवर यांनी दुप्पट मते घेत विजय मिळवला. यावेळी काँग्रेसला पहिल्यांदा नांदेडच्या जनतेने नाकरले होते, ते ही मोठ्या मताधिक्याने. त्यावेळी केशवर यांना ६७ टक्के मतं मिळाली होती.

त्यानंतर नांदेडच्या जनतेने दिवंगत शंकरराव चव्हाण यांना लागोपाठ दोन वेळा निवडून दिले. तर १९८७ च्या पोटनिवडणुकीत तिशीतल्या अशोक चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने खासदार केले. पण त्यानंतर लगेचच दोन वर्षात लागलेल्या १९८९च्या निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का बसला. १५ वर्षानंतर नांदेडमध्ये परिवर्तन झाले. नांदेडकरांनी अशोक चव्हाण यांना डावलून नवख्या डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांना निवडून देत देशात खळबळ उडवून दिली होती. अशोक चव्हाणांना या पराभवानंतर राजकारणात स्थिरावण्यासाठी १० वर्षे लागली. मात्र, त्यानंतर काब्दे यांना पुन्हा एकाही निवडणुकीत विजय मिळवता आला नाही.

१९८९ नंतर नांदेडकर सलग १५ वर्षे काँग्रेससोबत राहिले. मात्र, २००४ ला पहिल्यांदा नांदेडमध्ये कमळ फुलले. २४ हजारांच्या फरकाने भाजपाच्या डी. बी. पाटील यांनी काँग्रेसच्या के. भास्कर यांचा परभव केला. १९७७ नंतर नांदेडच्या जनतेने प्रत्येक १५ वर्षाला धक्कादायक निकाल दिले आहेत.

त्यामुळे २००४ नंतर आता पुन्हा एकदा १५ वर्षानंतर नांदेडकर धक्कायक निकाल देणार का? की काँग्रेसवरच विश्वास दाखवणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. १९९८ नंतर भाजपाने नांदेडमध्ये काँग्रेसला नेहमीच टक्कर दिली. मात्र, भाजपाच्या हातातोंडाशी आलेला घास काँग्रेसने हिरावून घेतला. अगदी थोड्या फरकाने इथे भाजापाला पराभव पहावा लागला आहे. ग्रामीण भागातील भाजपाची ताकद, जातीचे गणित आणि वंचित बहुजन अघाड़ीचा उमेदवार यामुळे अशोक चव्हाण यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण झाले आहे. याची जाणीव असल्यानेच चव्हाण यांनी गाफील न राहता आपले लक्ष फक्त नांदेडवर केंद्रीत केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 3:36 pm

Web Title: ashok chavan that will kill the history of nanded or not
Next Stories
1 राज ठाकरेंच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो-विनोद तावडे
2 अशोक चव्हाणांनी प्रचारासाठी भाडोत्री नेता आणला, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला
3 महाआघाडीच राहुल गांधींना मानत नाहीत पंतप्रधानपदाचा उमेदवार – नरेंद्र मोदी
Just Now!
X