20 October 2019

News Flash

अक्षय कुमार सारखा प्रश्न विचारण्याची हिम्मत कुठल्या पत्रकाराचीही झाली नसती – राज ठाकरे

राज ठाकरेंनी आज पनवेलच्या सभेत तोच धागा पकडून अक्षय कुमारच्या मुलाखतीची खिल्ली उडवली.

नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अभिनेता अक्षय कुमारला मुलाखत दिली.

अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीची सर्वत्र चर्चा आहे. अराजकीय स्वरुपाची अशी ही मुलाखत होती. राजकारणापलीकडे जाऊन मोदींच्या खासगी आयुष्याविषयी या मुलाखतीतून जाणून घेण्यात आले. मोदींनीही या मुलाखतीत त्यांची दीनचर्या कशी असते. त्यांना काय आवडते या अक्षय कुमारच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

राज ठाकरेंनी आज पनवेलच्या सभेत तोच धागा पकडून अक्षय कुमारच्या मुलाखतीची खिल्ली उडवली. अक्षय कुमारने मोदींना पण काय प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारण्याची कुठल्या पत्रकाराचीही हिम्मत झाली नसती. प्रश्न काय विचारला आंबा खाता का ?

हा काय पंतप्रधानांना विचारायचा प्रश्न आहे. चोखून खाता का? कापून खाता का? काय मजाक लावला आहे. इथे जनता सरकारवर अवलंबून आहे अशा शब्दात त्यांनी अक्षय कुमारच्या मुलाखतीवर टीका केली.

अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेच्या व्हिडिओचा मोदींच्या प्रचारासाठी वापर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी भाजपाचा आयटी सेल कशा प्रकारे व्हिडिओचा गैरवापर करुन फसवणूक करतो ते दाखवलं. मध्यंतरी नरेंद्र मोदींनी गुजरातमधून फॉर्म भरला असा एक व्हिडिओ त्यांच्या आयटी सेलने पोस्ट केला होता. त्यावेळी फॉर्म भरताना किती गर्दी झाली होती त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

त्यामध्ये मोदींच्या मागे मोठी जनसमूह दाखवला होता. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह सुद्धा त्या रॅलीमध्ये होते. याला म्हणतात रॅली, नेता अशा कमेंट मोदी समर्थकांनी त्या व्हिडिओवर केल्या होत्या. प्रत्यक्षात तो व्हिडिओ दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचा होता. त्या व्हिडिओमधील गर्दी मोदींच्या प्रचार रॅलीची गर्दी म्हणून दाखवली.

First Published on April 25, 2019 9:25 pm

Web Title: raj thackeray slam akshay kumar over modi interview