बारामती आणि भाजप, राष्ट्रवादी

लोकसभा निवडणुकीत यंदा कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायचीच, असा निर्धार भाजपने केला. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पुण्यात झालेल्या मेळाव्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बारामती जिंकायचीच, असा स्पष्ट आदेश दिला. लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ४५ जागा जिंकू आणि पच्चेचाळीसावी जागा ही बारामतीची असेल, असे जाहीर केले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी कोण उपयुक्त ठरू शकेल याची चाचपणी भाजप नेत्यांनी केली. शेवटी शरद पवार यांचे एकेकाळी निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार सुभाष कुल यांची सून कांचन कूल यांना उमेदवारी देण्यात आली. पूत्राच्या उमेदवारीमुळे अजित पवार मावळ मतदारसंघात अडकून पडल्याचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न होता. राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला गेल्या साडेचार वर्षांत शह देण्याचे काम केलेले चंद्रकांत पाटील हे बारामतीमध्ये तळ ठोकून बसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीमध्ये सभा घेण्याची योजना होती. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदी यांची सभा झाली होती, पण त्याचा काही फायदा झाला नव्हता. कारण काका-पुतण्यांना हद्दपार करा, असे आवाहन करूनही अजितदादा चांगल्या मताधिक्याने जिंकले होते. मोदी यांची सभा या वेळी बारामतीमध्ये झाली नाही. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काही तरी पडद्याआडून समझोता झाल्याची चर्चा सुरू झाली. हे ओळखूनच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली. भाजप आणि राष्ट्रवादीत नुरा कुस्ती नाही किंवा मैत्रीपूर्ण लढतही नाही, असे शहा यांनी जाहीर करावे लागले. मोदी यांची सभा न झाल्याने वेगळा संदेश गेला आहे. या साऱ्या चर्चेचा सुप्रियाताईंना कितपत फायदा होतो याचीच सध्या चर्चा आहे.

..लग्न घुगऱ्यावर पार पाडा!

स्वत:ची निवडणूक असेल तर नेता खर्च करतो. दुसऱ्याच्या निवडणुकीला मात्र तो फारसा उत्सुक नसतो. सध्या असाच प्रकार नगर जिल्ह्य़ात पाहायला मिळत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय हे भाजपकडून तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे दोघे सर्वच दृष्टीने सक्षम असल्याने तेथील निवडणुकीची चर्चा आहे. पण शिर्डी मतदारसंघातील उमेदवार तेवढे बलदंड नाहीत. पण अहमदनगरमुळे शिर्डीतील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक बाळासाहेब थोरात यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. हे गरिबाघरचं लग्न आहे. त्यामुळे घुगऱ्यांवरच समाधान माना, असे आवाहन ते विविध सभांमधून करत आहेत. तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे हेदेखील ही राखीव मतदारसंघाची गरिबांची निवडणूक आहे, असे आपापल्या कार्यकर्त्यांना सांगत फिरत आहेत.

आ क डे मो ड

विद्यमान लोकसभेत जास्त महिला खासदार निवडून आलेली राज्ये

उत्तर प्रदेश – १३

पश्चिम बंगाल – १२

महाराष्ट्र – ५

मध्य प्रदेश – ५

गुजरात – ४

तमिळनाडू – ४