भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातली आणखी तीन नावं आहे. महायुतीचा जागा वाटपाचा पेच वाढत असताना आणि त्यात मनसेही येईल का? या सगळ्या चर्चा सुरु असताना महाराष्ट्रात भाजपाने तीन नावं जाहीर केली आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २० जणांची यादी भाजपाने आधीच जाहीर केली आहे. आता भाजपाने आणखी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना मिळणाऱ्या जागा या बाकी २५ जागांमधून असतील यात शंका नाही. तर भाजपाने या निवडणुकीतून वरुण गांधींचा पत्ता कापला आहे.

आज कुणाला जाहीर झाली उमेदवारी?

भंडारा गोंदियातून सुनील बाबूराव मेंढे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. तर गडचिरोलीतून अशोक महादेव नेते भाजपाचे उमेदवार आहेत. सोलापूरमध्ये म्हणजेच प्रणिती शिंदेंच्या समोर भाजपाच्या राम सातपुतेंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार होईल असं दिसून येतं आहे.

सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके उडवत जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे आमदार राम सातपुते यांचा लढा आता लोकसभेच्या रिंगणात रंगणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४ आणि २०१९ यावेळी झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनदा पराभव पत्करावा लागला होता. वडिलांच्या पराभवाची सल दूर करण्यासाठी आता त्यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना काँग्रेसकडून तिकिट देण्यात आलं आहे. आता त्या पराभवाचा वचपा काढणार की भाजपा हॅटट्रिक साधणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.