छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील उमेदवारांच्या नावांवर नजर टाकल्यानंतर लक्षात येते की, भाजपाने प्रखर हिंदुत्ववादी उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. २०२१ साली कवर्धा सांप्रदायिक हिंसाचारातील प्रमुख आरोपी, बेमेतरा हिंसाचारात बळी पडलेल्या व्यक्तीचे वडील व धर्मांतराच्या विरोधात आवाज उचलणारे भाजपाचे नेते आणि माजी मंत्र्याचा या यादीत समावेश आहे. तसेच दिलीप सिंह जुदेव यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित असलेल्या दिलीप सिंह जुदेव यांनी छत्तीसगडमध्ये घरवापसी अभियान राबवून इतर धर्मात धर्मांतर केलेल्या आदिवासींना पुन्हा हिंदू धर्मात आणले होते. तब्बल चार दशके त्यांनी हे अभियान चालविले.

भाजपाच्या उमेदवार यादीवर टीका करताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, “त्यांनी आतापर्यंत लाखो वेळा प्रयत्न केला; पण हा विषय (धार्मिक दुही) कधीही यशस्वी होऊ शकला नाही.”

हे वाचा >> छत्तीसगड विधानसभा निवडणूक : भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, केंद्रातील नेत्यांना तिकीट!

दंगलखोर, दंगलीतील पीडित अशा उमेदवारांना तिकीट

छत्तीसगडमध्ये हिंदू धर्मीयांची ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन यांची लोकसंख्या प्रत्येकी दोन टक्के आहे. हिंदुत्वाच्या पाठिंब्यावर ९० पैकी ५१ जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. भाजपाने ८५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यात एकही मुस्लीम उमेदवार नाही. शिवाय धर्मांतराच्या विरोधातील अभियानामुळे बस्तरसारख्या आदिवासीबहुल भागात ध्रुवीकरणास मदत होईल, अशी अपेक्षा भाजपाला आहे. छत्तीसगडचे भाजपा प्रभारी व खासदार अरुण साव यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका करताना सांगितले, “भूपेश यांचे अकबर आणि ढेबर यांचे सरकार आहे.” रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांच्याबाबत हा टोमणा लगावण्यात आला होता. एजाज ढेबर यांचा भाऊ अन्वर याच्यावर २,००० कोटींच्या मद्य घोटाळ्याचा आरोप आहे. तसेच राज्याचे मंत्री मोहम्मद अकबर यांच्यावर कवर्धा हिंसाचाराचा आरोप भाजपाने केला आहे.

कवर्धा हिंसाचारातील प्रमुख आरोपी विजय शर्मा यांना भाजपाने अकबर यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. अकबर या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. कर्वधा हिंसाचारप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ८५ आरोपींचा समावेश आहे. त्यापैकी कर्वधा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या शर्मा यांचेही एक नाव आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि दंगल पेटवल्याच्या आरोपाखाली दोन महिने त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे.

याच प्रकारे या वर्षी ऑगस्ट महिन्यात बेमेतरा जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचारात भुनेश्वर या युवकाचा मृत्यू झाला होता. त्याचे वडील ईश्वर साहू यांना बेमेतरा जिल्ह्यातील साजा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे मंत्री रवींद्र चौबे या मतदारसंघातून सात वेळा आमदार राहिलेले आहेत. भुनेश्वर साहू याची हत्या झाल्यानंतर भाजपाने बेमेतरा जिल्ह्यात मोर्चा काढला होता आणि ‘छत्तीसगड बंद’ची हाक दिली होती. या बंददरम्यान उसळलेल्या हिंसाचारात एका मुस्लीम पिता-पुत्राची हत्या करण्यात आली.

हे वाचा >> छत्तीसगड सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले १८९५ कोटी रुपये, २४.५२ लाख लाभार्थी; वाचा काय आहे किसान न्याय योजना!

ईश्वर साहू हे शेतकरी असून, त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना साहू म्हणाले की, भाजपाने उमेदवारी दिल्याबाबत मी त्यांचा आभारी आहे. या निवडणुकीत मी जिंकून येण्यासा पूर्ण प्रयत्न करीन.

आरएसएसचे दिवंगत नेते दिलीप सिंह जुदेव कुटुंबियांना तिकीटे

बिलापूर जिल्ह्यातील कोटा मतदारसंघ आणि जांजगीर-चांपा जिल्ह्यातून चंद्रपूर या मतदारसंघात जूदेव यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना तिकीट देण्यात आले आहे. मागच्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते जशपूर जिल्ह्यात जुदेव यांच्या १२ फुटांच्या पुतळ्याचे उदघाटन करण्यात आले होते. या माध्यमातून संघासाठी त्यांचे विशेष महत्त्व असल्याचे यातून निदर्शनास आले. जूदेव यांचे सुपुत्र प्रबळ प्रताप सिंह यांना कोटामधून उमेदवारी देण्यात आली; तर प्रबळ यांच्या वहिनी संयोगिता सिंग जुदेव यांना चंद्रपूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. २०१८ साली त्यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा त्यावेळी पराभव झाला. त्याआधी संयोगिता यांचे दिवंगत पती युधवीर सिंह जुदेव हे दोन वेळा चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार राहिले होते.

भाजपाचे नेते व माजी मंत्री केदार कश्यप यांचा २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत २,६४७ एवढ्या थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला होता. आदिवासी धर्मांतराच्या विरोधात त्यांनी अनेकदा आवाज उचलला होता. या वर्षी नारायणपूर जिल्ह्यात धर्मांतर होत असल्याचा आरोप करून दंगल घडविल्याप्रकरणी केदार कश्यप यांना अटक करण्यात आली होती. या दंगलीनंतर भाजपाच्या आमदारांनी कथित धर्मांतराबद्दल विधानसभेतही निवेदन सादर केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ख्रिश्चन उमेदवाराला तिकीट देणे ढोंगीपणा

सरगुजा जिल्ह्यातील लुंड्रा मतदारसंघासाठी भाजपाने ख्रिश्चन आदिवासी प्रबोध मिंज यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने या उमेदवारीवरून भाजपावर निशाणा साधला. भाजपा मतपेटीचे राजकारण करीत असून, ख्रिश्चन मिंज यांना तिकीट दिल्यामुळे त्यांचा ढोंगीपणा उघड होत आहे. मिंज यांनी द इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्या पूर्वजांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. ज्यांचे बळजबरी, दबावाने किंवा आमिष दाखवून धर्मांतर केले जात आहे, त्यांच्याविरोधात भाजपा काम करीत आहे. मी २५ वर्षांपासून भाजपामध्ये काम करीत आहे. मी जर निवडून आलो, तर मोठी मंडई आणि चांगले रस्ते बांधण्यासाठी माझे प्राधान्य असेल.