कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला चारी मुंड्या चीत केले आहे. येथे काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळविला असून बहुमताचा आकडा पार केला आहे. कर्नाटकात एकहाती सत्ता आल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदीआनंद आहे. तर येथे भाजपाला अवघ्या ६६ जागांवर विजय मिळवू शकला आहे. दरम्यान, ही निवडणूक काँग्रेसने जिंकल्यानंतर येथे मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सूतोवाच केले आहे. काँग्रेस येथे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दोन बड्या नेत्यांमध्ये विभागून देण्याची शक्यता आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले संकेत

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील दोन बडे नेते आहेत. राज्यभर त्यांचा चांगलाच दबदबा आहे. किंबहुना या दोन्ही नेत्यांनी कसून मेहनत केल्यामुळेच काँग्रेसला कर्नाटकात विजय मिळू शकला आहे. असे असतानाच येथे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरच मल्लिकार्जुन खरगे यांनी भाष्य केले आहे. काँग्रेस शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन नेत्यांना अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होण्याची संधी देण्याची शक्यता आहे. तसे संकेत खरगे यांनी दिले आहेत.

हेही वाचा >> देशातल्या इतक्या राज्यांमध्ये आहे काँग्रेसची एकहाती सत्ता, जाणून घ्या एका क्लिकवर!

डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या यांचा केला उल्लेख

“लोकांनी मोदी तसेच भाजपाची सत्ता उलथवून लावण्याचे ठरवले आहे. कर्नाटकात आम्ही सिद्धरामय्या आणि डी‌. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना करू. आता आमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यावरही ही जबाबदारी आहे,” असे खरगे म्हणाले.

डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन- खरगे

कर्नाटकमधील विजय हा सर्वांचाच विजय आहे, असेही खरगे म्हणाले. “कोणीही एक नेता कर्नाटकमधील विजय माझ्यामुळेच झाला आहे, असे म्हणू शकत नाही. या निवडणुकीत अमुक व्यक्ती नसती, तर त्याची जागा अन्य एखाद्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने घेतली असती. ही प्रक्रिया राजकीय पक्ष तसेच लोकशाहीमध्ये घडतच असते. जेव्हा नेते चांगली कामगिरी करतात. तेव्हा कर्नाटकमधील निवडणुकीप्रमाणे चांगला निकाल लागतो. मी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो,” असे खरगे म्हणाले.

हेही वाचा >> Karnataka Election : बंगळुरूत मध्यरात्री हाय वोल्टेज ड्रामा, ‘या’ कारणामुळे काँग्रेसने जिंकलेली जागा गमावली, नेमकं काय घडलं वाचा!

तीन वर्षांसाठी राज्याला ग्रहण लागले होते- सिद्धरामय्या

सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन नेत्यांनीदेखील कर्नाटकमधील विजयानंतर आनंद व्यक्त केला. तसेच कर्नाटकमध्ये लोकांचा विजय झाला आहे, अशी भावना या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. “हा विजय माझा, सिद्धरामय्या किंवा कर्नाटक काँग्रेसमधील नेत्यांचा नाही. मागील तीन वर्षांपासून कर्नाटक राज्याला ग्रहण लागले होते. हे ग्रहण आता संपले आहे. आता अश्रू संपले असून आनंद, हास्य परतले आहे,” अशा भावना शिवकुमार यांनी व्यक्त केल्या, तर “कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यास राज्यातील सरकार अस्थिर असते. राज्यात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री असतील तर सरकार स्थिर नसते, असे सिद्धरामय्या म्हणाले.

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू- सिद्धरामय्या

“२०१३ साली काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. तेव्हा काँग्रेसने उत्तम कारभार केला होता. राज्यातील जनतेला कोणत्याही एका पक्षला स्पष्ट बहुमत द्यायचे होते. येथील लोकांना बदल हवा होता. या बदलासाठी त्यांनी काँग्रेसची निवड केली. येथील जनतेने काँग्रेसला पुन्हा एकदा संधी दिली आहे. आम्ही या संधीचा गैरफायदा न घेता लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू,” असेही सिद्धरामय्या यांनी आश्वासन दिले.

हेही वाचा >> कर्नाटक निवडणुकीचं चित्र स्पष्ट: कोणत्या पक्षाला किती जागा? निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी

आमच्यावर जबाबदार सरकार देण्याची जबाबदारी- रणदीप सूरजेवाला

कर्नाटकमधील विजयावर कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सूरजेवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कर्नाटक राज्याने इतिहास रचला आहे. येथील लोकांनी फक्त कर्नाटकच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक आशेचा किरण दाखवला आहे. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत. यासह एक पारदर्शक, जबाबदार सरकार देण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. आमचे सरकार प्रत्येक कानडी नागरिकाची सेवा करील, असे मी आश्वासन देतो,” असे सूरजेवाला म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंपरा आणि नियमांनुसार नेतृत्वाची निवड केली जाईल- शिवकुमार

“जेव्हा आम्ही सरकारची स्थापना करू तेव्हा पहिल्या दिवसापासूनच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू. मी कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आणून दाखवीन, असे आश्वासन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिले होते. मी माझे काम केले आहे. आम्ही शांतता आणि एकजुटीने काम करू. रविवारी (१४ मे) आमच्या नवनिर्वाचित आमदारांची एक बैठक होणार आहे. आमच्या पक्षातील परंपरा आणि नियमांनुसार नेतृत्वाची निवड केली जाईल,” असे शिवकुमार यांनी सांगितले.