भाजपाने लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. एवढंच नाही तर अब की बार ४०० पारचाही नारा दिला आहे. भाजपा हा पक्ष ३७० जागा जिंकेल तर एनडीएसह आम्ही ४०० जागांच्या पुढे जाऊ असा दावा भाजपा आणि नरेंद्र मोदींनी केला आहे. अशात प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच भाजपाच्या ४०० पारच्या नाऱ्यावर भाष्य केलं आहे. भाजपाचे लोक ज्योतिषी आहेत का? त्यांना आधीच कसं समजलं की ते ४०० पार जाणार? असा प्रश्न प्रियांका गांधींनी विचारला आहे.

मी काही ज्योतिषी नाही

“मी काँग्रेसची प्रभारी म्हणून काम केलं आहे. मी ज्योतिषी नाही. पण जनतेत जाते आहे, लोकांना भेटते आहे. १० वर्षांत काय काय घडलं आहे ते जनतेने पाहिलं आहे. लोकांना आता बदल हवा आहे. लोक १० वर्षांत या सरकारला कंटाळले आहेत. दहा वर्षांत एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीही बदल झालेला नाही. महागाई कमी झालेली नाही. आज रामनवमी आहे सण आहे अशावेळी लोकांकडे खरेदीसाठी पैसे नाहीत अशी स्थिती अनेक घरांमध्ये आहेत. बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या नाहीत. मोदींच्या आसपास जे लोक आहेत ते तर मोदींनी काय काम केली हेदेखील सांगत नाहीत कारण त्यांचा जनतेशी संपर्क तुटला आहे” असाही आरोप प्रियांका गांधींनी केला.

हे पण वाचा- राहुल आणि प्रियांका गांधींमुळे अमेठी आणि रायबरेलीची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात; काँग्रेसमधील संभ्रमाचे कारण काय?

तर एनडीए १८० जागाही जिंकणार नाही

“एनडीए भाजपाचा कुठल्या ४०० पार आणि ३७० जागा जिंकण्याचा दावा नेमक्या कुठल्या आधारावर करण्यात आला आहे. मला वाटतं आहे बहुदा यांनी काहीतरी गडबड आधीच करुन ठेवली आहे ज्यामुळे त्यांना माहीत आहे की आम्ही ४०० पार जाणार आहोत. मी काही ज्योतिषी नाही त्यामुळे आम्हाला नेमक्या किती जागा मिळतील हे आत्ता सांगू शकणार नाही. मात्र या देशात योग्य पद्धतीने निवडणूक पार पडली. ईव्हीएमचा कुठलाही घोळ झाला नाही तर भाजपा आणि एनडीए मिळून १८० जागाही जिंकणार नाही असं मी अत्यंत आत्मविश्वासाने सांगू शकते” असं प्रियांका गांधींनी म्हटलं आहे.

प्रियांका गांधी या आज सहराणपूरमध्ये होत्या तिथे त्यांनी काँग्रेससाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी निवडणूक रोख्यांवरही भाष्य केलं आहे. निवडणूक रोखे हे पारदर्शक असतील असं नरेंद्र मोदी म्हणाले होते प्रत्यक्षात हा सर्वात मोठा घोटाळा निघाला असाही आरोप त्यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.