Kalyan Rural Vidhan Sabha Constituency : कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा कल्याण विधानसभा मतदारसंघातून विभागून झाला आहे. २००८ साली झालेल्या विभाजनात कल्याण ग्रामीण मतदारसंघाची निर्मिती झाली. ठाणे जिल्ह्याच्या ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिकेचे आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे काही वॉर्ड या मतदारसंघात मोडतात. मनसेचे राजू पाटील हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून मनसेचे हे एकमेव आमदार आहेत.
कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. २००९ सालापासून येथे विविध पक्षाचे उमेदवार जिंकून आले आहेत. मनसेचे रमेश रतन पाटील २००९ साली आमदार होते. तर, २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सुभाष भोईर जिंकून आले. तर, २०१९ मध्ये पुन्हा एकदा मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी सत्ता काबिज केली. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेकडून राजू पाटीलच?
मनसेकडून पुन्हा एकदा राजू पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा आहे. शिंदे गटाकडून अद्याप कोणतंही नाव चर्चेत आलं नसून महायुतीत ही जागा कोणाला मिळतेय हे पाहावं लागणार आहे.
शिवसेनेतील फूट सुभाष भोईरांच्या पथ्यावर?
दरम्यान ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार सुभाष भोईर यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. कारण, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचं तिकिट कापण्यात आलं होतं. त्यामुळे ते पक्षावर नाराज होते. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटात राहणंच पसंत केलं.
हेही वाचा >> ठाणे-कल्याणच्या वेशीवर आगरी अस्मिता प्रभावी
महायुतीतून कोण?
दरम्यान, या जागेवरून महायुती काय निर्णय घेते हे महत्त्वाचं ठरणार आहे. महायुतीत ही जागा कोणत्या पक्षाला जातेय, त्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावर पुढची सर्व गणितं अवलंबून आहेत.
कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गातील मतदासंघ असू २०१९ च्या निवडणुकीत कल्याण मनसे आणि शिवसेना अशी दुहेरी लढत प्रामुख्याने झाली होती. यामध्ये राजू पाटील यांना ९३ हजार ९२७ मते मिळाली होती. तर, शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना ८६ हजार ७७३ मते मिळाली होती. रमेश म्हात्रे यांच्या फार थोड्या फरकाने पराभव झाला होता. तर, इथं एकूण ४७.९६ टक्के मतदान झालं होतं. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघही महत्त्वाचा मानला जातोय. कारण, या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासाठी चांगले मतदान झाले होते. याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. परंतु, ही जागा भाजपाकडे जाते की शिवसेनेकडे जाते हे पाहावं लागणार आहे.
मनसे विरुद्ध महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीतून शिवसेना (एकनाथ शिंदे) राजेश मोरे, मनसेकडून विद्यमान आमदार राजू पाटील आणि शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाने सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली आहे.
२००९ पासून कोणाला किती मते मिळाली?
२००९ मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या रमेश पाटील यांना ५१ हजार १४८ मते मिळाली होती. तर, शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना ४१ हजार ६४२ तर, काँग्रेसच्या रवी पाटील यांना २६ हजार ५४६ मते मिळाली. २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुभाष भोईर यांना ८४ हजार ११० मते, मनसेच्या रमेश पाटील यांना ३९ हजार ८९८ मते तर वांदरशेठ पाटील यांना १९ हजार ७८३ मते मिळाली होती. तसंच, २०१९ च्या निवडणुकीत राजू पाटील यांना ९३ हजार ९२७ मते, शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना ८६ हजार ७७३ मते तर वंचितच्या अमोल केंद्रे यांना ६ हजार १९९ मते मिळाली होती.
राजू पाटलांचा झंझावाती प्रचार
कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटलांनी झंझावाती प्रचार केला. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द राज ठाकरेही त्यांच्याकरता मैदानात उतरले होते. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विविध शहरांत जाऊन त्यांनी प्रचार केला. त्यांच्या तोडीस सुभाष भोईर आणि राजेश मोरे यांनीही प्रचाराचा धडाका लावला होता. या दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांनीही या हायवोल्टेज मतदारसंघात हजेरी लावून मतदाना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
ताजी अपडेट
कल्याण ग्रामीण मतदारसंघात मतदानाचा चांगला उत्साह दिसून आला. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात मोडतो. ठाणे जिल्ह्यात एकूण ५६.५ टक्के मतदान झालं आहे.
नवीन अपडेट
मनसेचा एकमेव आमदार असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील यांचा पराभव झाला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे राजेश मोरे यांचा १ लाख ४१ हजार १६४ मतांनी विजय झाला. तर, राजू पाटील यांना ७४ हजार ७६८ मते मिळाली असून त्यांचा ६६ हजार ३९६ मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.