परभणी, नांदेड : महाराष्ट्रात सत्तेत असताना काँग्रेस आणि नकली शिवसेनेने मराठवाडयातून निजामाचे राज्य गेले आहे, हे जाणवूच दिले नाही. मराठवाडयाचा विकास रोखणाऱ्या रझाकारी मानसिकतेला थारा देणार का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीच्या सभेत केला. तर नांदेडच्या सभेत दुष्काळ आणि पाण्याचे संकट एका दिवसात उद्भवलेले नाही, तर या विभागाचा श्वास कोंडून ठेवण्याचे काम काँग्रेसने केले, असा आरोप मोदी यांनी केला.
‘इंडिया’ आघाडीचा ‘इंडी’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले. काँग्रेस ही अशी आधारवेल आहे जिला ना स्वत:ची जमीन आहे ना पाळेमुळे. जो आधार देईल, त्यालाच ती शुष्क करते, अशी टिप्पणी करीत मोदी यांनी, ‘एनडीए सरकार मराठवाडयाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही दिली.
हेही वाचा >>> विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका
‘परभणीकरांना माझा राम राम’, ‘नांदेड आणि हिंगोलीकरांना नमस्कार. २६ तारखेची तयारी झाली आहे ना,’ अशी मराठीत भाषणाची सुरुवात करीत मोदींनी संवाद साधला. ‘‘काँग्रेस पक्ष गरीब, वंचित, दलित आणि शेतकऱ्यांच्या विकासात भिंतीसारखा आडवा आला. त्यांच्याकडून विकासाची अपेक्षा करता येईल का? काँग्रेस महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या समस्या दूर करू शकतात का’’ असे प्रश्न मोदी यांनी विचारले. विदर्भ आणि मराठवाडयाचा श्वास कोंडून ठेवण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसच्या धोरणांमुळे मराठवाडयातले शेतकरी गरीब राहिले, उद्योगनिर्मितीच्या शक्यता कमी झाल्या, युवकांना स्थलांतर करावे लागले, शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत आहे, असे मोदी म्हणाले.
परभणीला समृद्धीशी जोडून मनमाडपर्यंतचे रेल्वेमार्ग पूर्ण केले आहेत. कापूस, सोयाबीनपाठोपाठ भरडधान्य पिकविणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी चालना दिली जाईल. मराठवाडयाचा चेहरामोहरा बदलेल, असे मोदी म्हणाले. सिंचनाचे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, जलयुक्त शिवार आणि मराठवाडा वॉटर ग्रीड या दोन्ही योजनांना काँग्रेसने विरोध केला, असा आरोपही त्यांनी केला.
फडणवीस यांचे आश्वासन
पंतप्रधान मोदी यांनी कोटयवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. मोदी हे फकीर आहेत आणि जानकरही फकीर आहेत. जानकर हे जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहेत. भविष्यात महाराष्ट्राच्या खजिन्याची किल्ली जानकर यांच्याकडे असेल.
मोफत बियाणे, टेक्स्टाइल पार्कचे आश्वासन
कृषी विद्यापीठातील जमीन सिंचनाखाली आणून मराठवाडयातील शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत देण्यात येईल, कापूस उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जिल्ह्यात टेक्स्टाइल पार्कची निर्मिती केली जाईल, असे आश्वासन जानकर यांनी दिले.
मोदी काय म्हणाले?
* काँग्रेस ही आधारवेल आहे, जिला ना स्वत:ची जमीन आहे ना पाळेमुळे. जो आधार देईल, त्याचेच ती शोषण करते.
* काँग्रेस गरीब, वंचित, दलित, शेतकऱ्यांच्या विकासात भिंतीसारखा आडवा आला, त्याच्याकडून विकासाची अपेक्षा करता येईल का?
* काँग्रेसच्या धोरणांमुळे मराठवाडयातले शेतकरी गरीब राहिले, उद्योगनिर्मिती कमी झाली, युवकांना स्थलांतर करावे लागले. * समृद्धीचे काम पूर्ण केले, शक्तिपीठाचे काम मार्गी लावले, नांदेडची विमानसेवा सुरू केली. काँग्रेसने केलेले खड्डे आम्ही बुजवले.